मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, जीवनवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
मराठी साहित्यातील जीवनवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर
Advertisement