मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार कै. श्रीपाद नारायण पेंडसे. प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. फडके, खांडेकर प्रभावित मराठी कादंबरी एका आवर्तात फिरत असताना पेंडसे यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री.ना.पेंडसे यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे त्यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते. त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुश: त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत. घटना-प्रसंग, निवेदन, संवाद, भाषाशैली ह्यांसारख्या कादंबरीच्या घटकांची वेगवेगळी जाणीव ठेवून कांदबरीत केल्या जाणाऱ्या कृत्रिम सजावटीचे तंत्र पेंडसे ह्यांनी स्वीकारले नाही त्यांच्या प्रत्येक कादंबरीतील जीवनानुभव सहज-स्वाभाविकपणे रूपास येत गेला त्यामुळे कादंबरीच्या रूपाची एक वेगळी, अधिक परिपक्व जाणीव जोपासणारे कादंबरीकार म्हणूनही ते ख्याती पावले.
जागतिक महायुद्धासारखी महान घटना घडत असताना त्याच्या जीवनात कोणत्या घडामोडी होत होत्या व त्या महान घटनेने त्याच्या जीवनाला कितपत स्पर्श केला, ह्याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ऑक्टोपस ह्या कादंबरीत, संवाद व पत्रे ह्यांच्या साहाय्याने पूर्ण आशय पेलण्याचा प्रयोग त्यांनी करून पहिला आहे. फडके—खांडेकर युगानंतरची नवी मराठी कादंबरी प्रामुख्याने पेंडसे ह्यांच्या कादंबऱ्यांतून प्रकटली. रंजनात्मकतेच्या पलीकडे जाऊन, स्वतःला तीव्रतेने जाणवलेली अनुभवसृष्टी त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून प्रामाणिकपणे उभी केल्यामुळे हरिभाऊंच्या परंपरेशी पेंडसे ह्यांच्या कादंबरीलेखनाचा सांधा सहजपणे जुळला. आपल्या अनुभवांचे रंगरूपही त्यांनी बारकाईने न्याहाळून आणि समजावून घेतले होते. विशिष्ट प्रदेशात आणि वातावरणात माणसांची मने आणि जीवने कसकसे रंग धारण करतात, ह्यासंबंधीच्या शोधातून आणि आकलनातून जन्माला आल्यामुळे पेंडशांच्या कादंबरीला मोठे बळ लाभलेले आहे. तथापि कल्पनारम्यता आणि स्वप्नरंजन ह्यांचा मोह त्यांनाही पूर्णत: टाळता आलेला नाही, अशी टीकाही त्यांच्या कादंबऱ्यांवर झालेली आहे. त्यांनी नाट्यलेखनही केलेले आहे. राजे मास्तर (१९६४), यशोदा (१९६५), गारंबीचा बापू (१९६५), असं झालं आणि उजाडलं (१९६९) ही त्यांची नाटके त्यांच्या अनुक्रमे हद्दपार,यशोदा, गारंबीचा बापू आणि लव्हाळी ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपे असून महापूर (१९६१), संमूसांच्या चाळीत (१९६७), चक्रव्यूह (१९७०) अशी काही स्वतंत्र नाटकेही त्यांनी लिहिली आहेत. जुम्मन (१९६६) हा त्यांचा कथासंग्रह.