मराठी आधुनिक साहित्यातील अग्रगण्य साहित्यिक कै. गजानन दिगंबर माडगूळकर. कवी, गीतकार, पटकथालेखक अशा विविध रूपात गदिमा यांची ओळख मराठी साहित्यात आहे. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली खूप लिहावेसे वाटू लागले त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला.
नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले.
माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मिकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान अजोड आहे. चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार कथाविषयाला खुलवत आणणारी चित्रपटगीते लिहिण्यात ते निष्णात होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये. गदिमांच्या अनेक गीतांमध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडलेलं दिसतं. ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’ या पंक्ती मानवी जीवनाचं सार आहेत. ‘जगाच्या पाठीवर’ची गीते तर पराकोटीच्या तत्त्ववेत्त्याने लिहिल्यासारखी वाटतात. ‘इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना परी चिरंजीविता, बोरी-बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार, अजब तुझे सरकार’.. किंवा ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’.. असो, गदिमांची चिंतनशील वृत्ती यात दिसून येते. ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’ यासारखं कटू सत्य सांगणारं गीत तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नदिनी लिहिलं आहे!