मराठी साहित्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

समाजसुधारक, लोककवी आणि लेखक कै. अण्णाभाऊ साठे. त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे. साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

१९४४ ला त्यांनीलालबावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।। ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगस्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या.

अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनात अद्भुतता, अतिशयोक्ती, अतार्किकता आहे, पण त्यात तेवढेच नाही; त्यातून जीवनातील विदारक वास्तवही प्रगट झाले आहे. लोककथेतील अद्भुतता, अतिशयोक्ती मानवी मनाला भुरळ घालते. पण त्यातून प्रगट झालेले जीवनातील तत्त्वज्ञान व वास्तवाचे दर्शन त्या मनाला अंतर्मुख करून विचार करायला लावते. रंजन करता करता व्यापक जीवनदर्शन घडविण्याचे सामर्थ्य लोककथेत असते. लोकपरंपरेतील मौखिक साहित्याचे वैशिष्ट्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून कलात्मक रूप घेऊन आविष्कृत झालेले आहे. या संदर्भात त्यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा लक्षात घेता येईल. गाव सोडून मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला भीमा दगडाच्या खाणीत काम करीत असतो. पण ती खाण अचानक बंद होते. उपाशी असलेला भीमा स्मशानातून-प्रेतातून सोने शोधण्याचे काम सुरू करतो आणि एका रात्री भीमा पुरलेले प्रेत उकरत असताना कोल्ही-लांडग्यांचा प्रेतावर हल्ला होतो. भीमा आणि त्या हिंस्र प्राण्यात झुंज सुरू होते, त्या झुंजीचे अद्भुत चित्रण अण्णाभाऊ करतात. त्या झटापटीत प्रेताच्या जबड्यात भीमाचा हात अडकून त्यांच्या हाताची बोटे तुटतात. आता बंद पडलेल्या खाणीचे काम सुरू होते, पण काम करणाऱ्या भीमाच्या हाताला बोटे नसतात. पोट जाळण्यासाठी भीमाने केलेल्या घनघोर लढाईचे वर्णन अण्णाभाऊंनी समर्थपणे केले आहे. भुकेच्या तीव्रतेचे भयानक दारिद्र्याचे वास्तव कथेत आहे. अशा प्रकारच्या अनेक कथांमध्ये अद्भुत आणि वास्तव एकाचवेळी अवतरते. हे अण्णाभाऊंनी मौखिक साहित्याच्या परिचयातून आत्मसात केले आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काळात लेखनाला सुरुवात केली, त्यावेळी वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके वाङ्मयविश्वाच्या यशशिखरावर आरूढ झालेले होते. ना. सी. फडके यांच्या लेखनाने प्रेमाची स्वप्नचित्रे रेखाटून तरुण-तरुणींची मने काबीज केली होती आणि वि. स. खांडेकरांनी देशप्रेमाच्या आणि ध्येयवादाच्या स्वप्नाळू दुनियेत तरुण पिढीला गुंतवून त्यांना आकर्षित केले होते. अण्णाभाऊ साठे, या दोन्ही लेखकांनी उभा केलेला वाङ्मयीन माहोल बाजूला सारून स्वतःचा एक नवा रस्ता निर्माण करीत होते. ‘मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही’, अशी त्यांची लेखनामागील भूमिका होती. ‘माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसे फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती फार महान आहे, त्यांच्या बळावरच हे जग चालतं. त्यांची झुंज आणि त्यांचं यश यावर माझा विश्वास आहे’, असे त्यांचे मत होते.

अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोक जीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांचा व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात त्यांची अशी धारणा होती. अण्णाभाऊंच साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं. जनमानसात प्रसिद्ध पावलं अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे, तर शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं ते म्हणत. यांच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत सोशीत-उपेक्षितच होता.

वर्गीय क्रांतीची उकल करण्यासाठी त्यांनी तमाशाचा बाज नेमकेपणानं उचलला. तमाशातल्या नृत्यांगनेचे चाळ काढून टाकले आणि वीररसाच्या अंगाराचे चाळ चेतावणारा बंडखोर बंडागळी उभा केला. जुन्या कथेचा ढाचा ठेऊन नव्या युगाचा अकलेचा मोर्चा बांधला. तमाशात परंपरेने चालत आलेला गण बदलून टाकला. त्याजागी श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं साकारला. खऱ्या-खोट्याचे कोडे घालून सामान्यातल्या सामान्य माणसाचं कुतूहल वाढवीत त्यांनी आदिवासींची, कोळी-भिल्लांची, मांग-महार, रामोशांच्या व्यथा वेदनांचा हुंकार शाहिरीच्या लोकबाजातून कथा-कादंबऱ्यांतून मांडला.

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या म. फुले अध्यासनाचे प्रमुख आहेत.)

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!