मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, लेखिका, आणि नाटककार कै. पद्मा विष्णू गोळे. स्त्रीचे भावविश्व आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी ठेवून काव्यसृष्टीची उपासना करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांचे मराठी कवितेत अनन्यसाधारण असे स्थान आहे. स्त्रीचे भावविश्व हा त्यांच्या कवितेचा केंद्रविषय असला तरी निसर्गसौंदर्य, बदलत्या वातावरणात स्त्रीमनाची होणारी घुसमट, ताणतणाव, तगमग त्या समर्थपणे व्यक्त करतात. माझ्या पाठच्या बहिणी, आईपणाची भीती, चाफ्याच्या झाडा, मी माणूस, लक्ष्मणरेषा अशा अनेक कविता हे अधोरेखित करतात.
अन्य कवींप्रमाणेच पद्माताईंच्या काव्यविश्वावरही सुरुवातीला गोविंदाग्रज, भा. रा. तांबे तसेच रवींद्रनाथांच्या लेखनाचा प्रभाव होता. प्रीतिभावनेइतकेच स्वातंत्र्य, समतेच्या मूल्यांचे आकर्षण त्यांच्या काव्यात दिसते. रविकिरण मंडळानंतरच्या स्थित्यंतराच्या काळात पद्माताई, इंदिरा संत आणि संजीवनी मराठे यांनाच आधुनिक कवितेचा आरंभबिंदू मानावे लागेल. प्रेम, वात्सल्याचे अनेक सूक्ष्म पदर त्यांच्या कवितेतून उलगडताना दिसतात. मराठी काव्यप्रांतात त्यांच्या कवितेने ठसठशीत ओळख निर्माण केली आहे.
स्त्री प्रेमाचे विविध पैलू, विपुलतेने आणि सरसतेने दाखवणं, नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ व तेजस्वी आदर्श पुढे ठेवणं, समाजवादाचा स्पष्टपणे पुरस्कार करणं ही पद्मा गोळे यांच्या कवितेची वैशिष्ट्यं आहेत. त्यांच्या काव्यात सहजता व कोमलता हे गुण प्रामुख्याने आढळतात. त्यांनी ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ या संस्थेची स्थापना केली होती. त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या मनोगतात त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात मी काव्याच्या रूपाने पहिलेच पाऊल टाकत आहे, पण शारदेवरील भक्ती व रसिकांच्या सहृदयतेवरील विश्वास यामुळे मी काव्यलेखन करण्याचे धाडस करते”
‘प्रितिपथावर’ ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्गप्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये.