आपल्या परखड लेखनाने जनमानस ढवळून काढणारे प्रसिद्ध मराठी लेखक भालचंद्र नेमाडे

मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, प्रसिद्ध मराठी लेखक श्री. भालचंद्र नेमाडे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्‍याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मयप्रकार, भाषाविज्ञान, भारतीय साहित्य, तौलनिक साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य इ. त्यांचे अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय आहेत.

भालचंद्र नेमाडे यांच्या लेखनातील टोकदारपणा, तिरकसपणा, परंपरेची मोडतोड करणारी परखड शैली, चिकित्सक दृष्टी, देशीवादाचा प्रखर पुरस्कार आणि त्यांनी मांडलेला मूल्यविचार या साऱ्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. कोसलापासून हिंदूपर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यकृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्यविश्वात वादाचे मोहोळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक आत्मभान असलेले लेखक आहेत. नेमाडे यांच्या कवितेला कोणत्याही एका काव्यपरंपरेत समाविष्ट करणे अवघड आहे. त्यांच्या कवितेत विशाल मानववादाचा उत्कट करुणेचा आविष्कार दिसतो तसेच त्यांच्या अनेक कविता निवेदक ‘मी’ चे आत्मचरित्र सांगणाऱ्या आहेत. १९७० मध्ये मेलडी हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९९१ मध्ये देखणी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. पण त्यांना ओळख मिळाली ती १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ या कादंबरीमुळे आणि नंतरच्या त्यांच्या समीक्षालेखनामुळे.

भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांनी आपल्या शैक्षणिक तसेच सामाजिक जीवनाचे अंतर्भेदी चित्रण करून वाचकांना अंतर्मुख करायला लावले. त्यांच्यामते कादंबरीने वाचकांना अस्वस्थ केले पाहिजे. शिवाय त्या कृतीने समाजाची इंचभर का होईना, प्रगती झाली पाहिजे. या भूमिकेतूनच नेमाडे यांनी आपले कादंबरीलेखन केले आहे. एकूणच महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व, प्रेमाकर्षण, तरुणपण, बेकारी, सर्वत्र आढळणारा मूल्यऱ्हास, नोकरीतील-शिक्षणक्षेत्रातील कमालीची बकाली, समाजातील आणि नात्यातील गुंतागुंत या साऱ्या वास्तवाला तोंड देणारा ‘झूल’ कादंबरीतील चांगदेव पाटील. चांगदेवचा सहप्रवासी नामदेव भोळे कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर हे सारे आपल्यातलेच वाटत असल्याने, आपल्याच आयुष्याचे प्रतिबिंब असल्याने, त्यांच्या कोसला, बिढार, जरिला ते हिंदू पर्यंतच्या सर्व कादंबरऱ्या लोकप्रिय झाल्या. हिंदू ही ६०३ पानांची दीर्घ कादंबरी आहे. नेमाडे यांनी हिंदू संस्कृतीचे केवळ भारतदेशाच्या संदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या नकाशावर, आपल्या देशी अस्तित्वानिशी मांडलेले आख्यान केवळ अपूर्व आहे. आज उग्र होऊ पाहणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेला आव्हान देणारा आणि हिंदू या संकल्पनेचाच मूळापासून विचार करायला लावणारा हा व्यापक पट आहे.

मेलडी (१९७०), देखणी (१९९१) हे कवितासंग्रह; कोसला (१९६३), बिढार (१९७५), झूल (१९७९) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ (२०१०), जरिला ह्या कादंबऱ्या; साहित्याची भाषा (१९८७), टीकास्वयंवर (१९९०), तुकाराम (१९९४), साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (२००१) दि इनफ्लुअन्स ऑफ इंग्लीश ऑन मराठी (१९९०), अ सोशिओलिंग्विस्टिक ॲन्ड स्टायलिस्टिक स्टडी, नेटिविझम मराठी-इंग्रजी समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मलयाळम्, गुजराती, पंजाबी, उर्दू, उडियामध्ये अनुवाद झाले असून विशेष म्हणजे त्यांच्या झूल आणि हिंदू कादंबरीचे ब्रेल या अंधांसाठीच्या लिपीतही रूपांतर झाले आहे.

श्री. भालचंद्र नेमाडे हे मातृभाषा मराठीचा देशीयतावादी पुरस्कार करणारे लेखक असल्याने, त्यांनी आपली पहिली कादंबरी ‘कोसला’ ते ‘टीकास्वयंवर’मधील जवळजवळ सर्वच समीक्षालेखातून देशीवादाचा पुरस्कार सतत केला आहे. आधुनिक मराठी आणि भारतीय साहित्य, इंग्रजीसारख्या संकुचित साहित्य संकल्पनांवरच नको इतके विसंबून राहत आहे ही टोचणी एक प्राध्यापक, संशोधक, समीक्षक म्हणून त्यांना सतत अस्वस्थ करते.

संदर्भ :
देशमुख, श्रीकांत (संपा), भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य, साक्षात प्रकाशन, औरंगाबाद.
सानप, किशोर, भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा, साकेत प्रकाशन, औरंगाबाद.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here