जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका कै. मोगुबाई कुर्डीकर. मोगुबाईंची गायकी ही लयकारी व बोलतानांवर आधारलेली होती. स्वर व लयीची सुंदर गुंफण त्यांच्या गायनात आढळत असे. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल. मोगूबाईंना आईने १९११ साली हरिदासबुवांकडून प्रथम गानसंस्कार केले. पण हरिदासबुवा म्हणाले मी एका गावात फार दिवस राहत नाही त्यामुळे त्या हताश झाल्या.
मोगूबाईंच्या आईने शेवटच्या श्वासाआधी बाळकृष्ण पर्वतकराना बोलावून आपली अखेरची इच्छा प्रगट केली ‘मोगू’ तुझ्याभोवती घोटाळणारा माझा आत्मा ज्या दिवशी तू मोठी गाइका म्हणून मान्यता पावशील त्याच दिवशी पावन होईल. मोगूबाई मुळातच बुद्धीमान. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली की चटकन आत्मसात करायच्या. वयाच्या ९व्या वर्षी १९१३ साली त्यांनी चंद्रेश्र्वर भूतनाथ नाटक कंपनीत दाखल झाल्या. पण योगायोग विचित्र होता १९१४ साली मातोश्री जयश्रीबाईना मोगूबाईंपासून देवाने अलग केले त्यांची छत्रछाया गेली.
१९१७ साली सतारकर स्त्री नाटक कंपनीत दाखल झाल्या तेथेच चिंतुबुवा गुरव यांनी त्यांना गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली. त्याच वेळी रामलाल यांच्याकडून त्यांनी दक्षिणात्य नृत्याचे शिक्षण घेण्यासही सुरूवात केली. नर्तनातील मोहक पदन्यास भावपूर्ण मुद्रा लय व अभिनय हे पुढे त्यांच्या स्वरांना सखोल समज व परिणाम देण्यास उपयोगी पडले. चिंतुबुवाना मोगूबाईंच्यात आकलन शक्तीला आणि ग्रहण क्षमतेला एक प्रकारची धार होती तसेच गाणं शिकण्यासाठी कितीतरी ओढ आणि तत्परता आहे असे वाटले. सुरांवरील हुकूमत तालाच ज्ञान व सुरेल संगीत सादर करण्याच भान निराळ होत.
१९२० साली मोगुबाईंना स्वतःहून शिकविण्यासाठी त्यांचे रियाजाचे बोल ऐकून संगीतसम्राट खाँसाहेब अल्लादियाँखाँ यांनी आपण होऊन त्यांचा शिष्या म्हणून स्वीकार केला. अल्लादियाखाँ साहेब ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्यांच्या जवळच्या मागील बाजूस मोगूबाई राहत होत्या. त्यांच्या गाण्यातील बदल त्यांना असहय झाला. अल्लादियॉखाँ यानी त्यांच्या भावाला हैदरखाँना कोल्हापूरहून बोलावून मोगूबाईंची तालीम पुन्हा सुरू केली ते साल होते १९२६ आणि घराणे जयपूर. १९२६ सली सूरू झालेली तालीम १९३१ सालच्या एप्रिल महिन्या पर्यंत चालू होती.
मोगूबाईंच्या काळात संगीतविद्या आत्मसात करण ही सोपी गोष्ट नव्हती कारण थोर उस्तादांच्या जीवन धारणा वेगळया होत्या. आपली विद्या आपल्या कुटुंबीयाना वारसदारनाच देण्याची अत्यंत संकुचित आणि मर्यादित कल्पना असल्यानं इतर कोणालाही ही कला मिळवणं म्हणजे कष्टाचं व किमतीचं काम होतं. विद्यादानाच्या बाबतीत ही मंडळी कंजूष होती. इतर कलकार आपल्या अनमोल चिजा हिरावून नेतील म्हणून फारच गुप्त ठेवण्यात येत असत. ‘कुबेरान आपल अक्षय भांडार चोरांच्या भीतीनं भूमीत दडवावं अशा पैकी हा प्रकार होता” हे गोविंदराव टेंबे यांनी फार खेदाने म्हंटलं आहे.
लेखन व संशोधन – जगदीश पटवर्धन
मोगुबाई कुर्डीकर यांच्या शिष्या पद्मा तळवलकर – माईंचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या गाण्यासारखंच पवित्र, सोज्ज्वळ होतं. त्या गाण्याला तपस्येचं तेज होतं आणि व्यक्तिमत्त्वाला दरारा होता. ख्याल गायकीत आणखी काहीतरी घालून गायिका बनावं असं माईंना कधी वाटलंच नाही. ‘‘एकामागून एक चार, फक्त ख्याल गाऊन तुम्ही मैफल मारू शकलात तर तुम्ही खरे खानदानी गवई झालात,‘‘ असं त्या नेहमी सांगायच्या. या बाबतीत आम्ही हरलो. सर्व प्रकारची प्रतिकूलता असूनही माई मात्र जिंकून गेल्या. मुखडा सुंदर करण्यासाठी तो नटवावा, त्यात काहीकाही भरावं, त्यात विविधता आणि वैचित्र्य आणावं, असं माईंनी कधीच केलं नाही. अगदी त्याच जागेवरून उठून तसाच तो समेला येई आणि तरीही प्रत्येक वेळी तो नवा, वेगळा आनंद देई. आलापीबरोबर तो असा काही जुळून येई की आलापीच्या कोंदणातला जणू हिरा. माईंच्या कलाकृतीत अंधुकपणा बिलकुल नव्हता. काम सूक्ष्म असूनही त्यात इतकं सौष्ठव होतं! माईंची लयीवर हुकूमत होती म्हणजे किती? अनभिज्ञ श्रोत्यांपर्यंत आवर्तनाची जाणीव त्या संक्रमित करू शकत होत्या. अस्ताई सुरू केली की जणू संपूर्ण मैफलीला सम दिसू लागे- अवघी मैफलच माईंबरोबर हो-हो करत मुखडा घेऊन समेला येई! असं ते हुकमी काम होतं. माई प्रत्येक बाबतीत काटेकोर होत्या. जसं गाण्याचं, तसंच नेसण्याचं, बसण्याचं, वेळेचं. सबब ही गोष्ट त्यांच्या कोशात नव्हती. दुसऱ्यासाठी नाही आणि स्वतःसाठी तर नाहीच नाही. सत्तराव्या वर्षीही माई नियमितपणे तबलजी लावून रियाज करीत. गाणं ठरलं की त्या मैफिलीच्या रागांचा सकाळ- संध्याकाळ रियाज चाले आणि मग तो एकेक राग जो चढे, तो श्रोत्यांच्या स्मरणातून आयुष्यभरात न उतरावा.