सौंदर्यवादी लेखक, मराठी नवकथेचे जनक पुरुषोत्तम भावे

मराठी भाषेतील प्रतिभासंपन्न लेखक कै. पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या १०९ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन. हृद्यस्पर्शी कथा, चित्तवेधक प्रवासवर्णने, संवेदनशील व भावस्पर्शी नाटके, ओघवते ललितगद्य, चिंतनात्मक लेख इत्यादी विविध साहित्यप्रकार त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीमधून हजारो मराठी वाचकांच्या आठवणींच्या पानांवर चिरायू केले आहेत. मराठी नवकथेचे जनक, असे त्यांना मराठी साहित्यपटलावरती आदराने संबोधले जाते.

जुलै १९३१ साली किर्लोस्कर खबरमध्ये त्यांची ‘फुकट’ ही कथा प्रकशित झाली. तथापि त्यांचे लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रगट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या नागपूरच्या सावधान या साप्तहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होताच, त्यांतून प्रगट होणार्‍या भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने वाचक मुग्ध होऊन गेले. “आदेश“ या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकातूनही त्यांचे अनेक चित्तवेधक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मूलतःप्रचारी स्वरूपाचे स्वरूपाचे असूनही त्यांचे अनेक लेख वाङ्‍मयगुणांनी मंडित झालेले दिसतात. त्याचे कारण भावेंची विशिष्ट लेखनशैली हेच होय. “रक्त आणि अश्रू“ हा त्यांचा लेखसंग्रह मराठी निबंधवाङ्‍मयाताही अद्वितीय ठरला आहे.

वाघनखे, विठ्ठला पांडुरंगा , अमरवेल, रांगोळी, असे एकुण चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. १९७४ साली प्रकाशित झालेल्या स्मरणी हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रह उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे सावल्या, प्रतारणा, नौका, घायाळ, ध्यास, मुक्ती अशा एकाहून एक सरस कथा त्यांनी लिहिल्या.
तसेच त्यांच्या व्याध, पिंजरा, रोहिणी अशा कादंबऱ्यांनादेखील जाणकार वाचकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती. स्वामिनी, विषकन्या, महाराणी पद्मिनी ही नाटके आणि सौभाग्य, माझा होशील का? या दोन चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version