इंद्रनील फडके / प्रेरणागीत /
हे सौख्य भारताचे, कार्य नवे घडविण्याचे
शिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे
तो शूर सूज्ञ राजा, गाथा पराक्रमाची
धूळधाण ही करावी, येत्या परचक्राची
शिकवी नव्या पिढीला, हे पाठ स्वतंत्रतेचे
शिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे
छाटोनी हात पाय, नगरी वरात नेली
देऊनी न्याय तिला, स्त्री सखी सन्मानली
शिकवी नव्या पिढीला, पाठ खऱ्या पुरुषार्थाचे
शिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे
विविधता ही धर्म जातीची, भिन्न भिन्न वंशाची
स्वराज्य बांधले पायावरती, भावना ठेवूनी ऐक्याची
शिकवी नव्या पिढीला, हे पाठ एकात्मतेचे
शिवबा गुरु मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे
राष्ट्रप्रेम धर्म मानी, राष्ट्र हाची स्वर्ग
शिवबा शिष्य आम्ही, राष्ट्रकार्यात गर्क
हे सौख्य भारताचे, कार्य नवे घडविण्याचे
शिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे