लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
या कथेच्या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की, ट्रोजन हॉर्स बद्दल या कथेत सांगितलं गेलं आहे. ‘कपटमार्गाने निर्धास्त शत्रूच्या गोटात प्रवेश मिळवण्याचा साधनाला ट्रोजन हॉर्स म्हणतात.’
जॅक्सन आणि गुप्ता आपल्या (एस एस ६) यानातून अंतराळावर पाळत घालत असतात. तितक्यात त्यांना यांतील कंट्रोल पॅनलवर लाल दिव्याचा सिग्नल मिळतो.
२०५० साली पृथ्वीभोवती अनेक अंतराळयाने फिरत असतात आणि प्रत्येक यानांची नोंद युनायटेड स्पेस फेडरेशनच्या (यू एस एफ) विशाल गणाकयंत्रात केलेली असते. मात्र जॅक्सन आणि गुप्ताला मिळालेल्या सिग्नलबाबत त्यांना शंका होती कारण तो सिग्नल नोंद नसलेल्या यानाचा होता. यू एस एफ हेडक्वार्टर मध्ये याबाबत काही निवडक लोकांनाच कल्पना होती. त्यातील डॉ. फ्लेमिंग हे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींची तातडीने सभा घेतली. एस एस ६ ने दिलेल्या माहितीप्रमाणे नोंद न केलेले यान पृथ्वीजवळ येत आहे. एक तर आपण या यानाचा नाश करायचा किंवा या यानाची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर उपाय काढायचा. त्या यानाबद्दल रिमोट सेंसिंग ने चित्रीकरण करण्यास सर्व जणांनी होकार दिला. त्या यानाला एक्स हे नाव देण्यात आले.
एक्सबद्दल सर्व माहिती गोळा करून शास्त्रज्ञांना हे लक्षात आले की हे यान १९७२ साली अंतराळात सोडले होते, आपलं ग्रह मंडळ ओलांडून ते आकाशगंगेत इतर ताऱ्यांच्या भागात गेलं. या अंतराळात पृथ्वी या ग्रहावर जीवसृष्टी आहे हे इतर आकाशगंगेतील ग्रहावर जीवसृष्टी आहे का आणि असल्यास त्यांना आपल्याबद्दल कळू देण्यासाठी सोडलं होतं. इतक्या विशाल अंतराळात भिरकवलेलं यान नेमकं परत इकडे कसं आलं याचा त्यांना प्रश्न पडला. कुठल्यातरी प्रगत संस्कृतीला ते सापडलं आणि कोड (code) सोडवून आपला पत्ता लावला.
डॉ. फ्लेमिंग आपल्या पुढच्या कामाच्या तयारीला लागतात तेवढ्यात त्यांचा दहा वर्षांचा मुलगा त्यांना ट्रोजन हॉर्स बद्दल विचारतो आणि डॉ. फ्लेमिंग त्याला त्या शब्दाचा अर्थ सांगतात आणि तेव्हा त्यांना एका वेगळ्याच अनपेक्षित असणाऱ्या धोक्याची शंका भेडसावते. ते त्वरित यू एस एफ मध्ये गेले आणि आपल्या सहकाऱ्यांची सभा घेतली. त्या सभेत डॉ. फ्लेमिंग यांनी सांगितलं की, येणाऱ्या यानाचे आपण फोटो घेत असताना प्रकाश सोडण्याऐवजी इलेक्ट्रॉन्स वापरायचे.
पुढच्यावेळी केलेल्या चाचणीत जेव्हा एस एस ६ ने एक्सचे फोटो इलेक्ट्रॉन्स साहाय्याने घेतले तेव्हा एक्स यान त्या फोटोंमध्ये दिसलं नाही. याचा अर्थ डॉ. फ्लेमिंग यांच्या लक्षात आला. ते यान नसून ट्रोजन हॉर्स पद्धतीने बनवलेली यानाची प्रतिकृती आहे आणि हे ज्यांना शक्य आहे ते तंत्रज्ञानात आपल्या किती पुढे गेलेले आहेत याची आपण कल्पना करावी. समजा आपण हा प्रयोग न करता त्या यानाचे स्वागत केले असते तर आपण स्वतःचा नाश करून घेतला असता. असो, आपण अंतराळातच त्या यानाचा रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने नाश करू. त्या यानाचा नाश होताना पृथ्वीवरून भरदिवसा दिसला. सुदैवाने त्याचे दुष्परिणाम झाले नाहीत. पण डॉ. फ्लेमिंग यांनी विचार केला की, ही मिळालेली तात्पुरती उसंत आहे.. पुढे याहूनही भयंकर घटना घडण्याची शक्यता आहे.