गंजीफ्रॉकवाला नाम्या आणि त्याची दूरदृष्टी

– कल्पेश सतिश वेदक

वर्तमानपत्र दररोज घेऊन वाचणं ही झाली सर्वसामान्य नियमित सवय पण ते वर्तमानपत्र जाड भिंगाने वाचणारा नाम्या काय वाचतो, देव जाणे! दररोज त्याला याप्रकारे वर्तमानपत्र वाचत असताना एकदा घारु अण्णांनी विचारलंच, “काय रे नाम्या, दिसत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासून घे. नाहीतर भिंगाचा चष्मा लागेल कार्ट्या.” नाम्या नेहमीप्रमाणे विचित्र पद्धतीने आपले डोळे मिचकावीत हसत म्हणाला, “सर्व नीट दिसतंय हो अण्णा, वर्तमानपत्रातली बातमी खोलात जाऊन वाचण्याचा प्रयत्न करतोय. बघतो बातमीबद्दल अजून काही सापडतंय का? ती दूरदृष्टी काय ती महाभारतातल्या संजयला लाभली होती म्हणे, आपल्याला कसलं दिसतंय या चाळीपलीकडे म्हणून वर्तमानपत्र भिंगाने वाचतो नेहमी.” हा असला नाम्या, ‘डोंबल्याच्या चाळीत’ राहणारा, नेहमी गंजीफ्रॉक आणि रंगीत पट्टे असलेली पँट घालणारा, घारु अण्णांची घरातली सर्व कामं करणारा आणि त्यांचा ओरडा खाणारा हा नाम्या बहिरट.

एके दिवशी चाळीची अतिमहत्त्वाची सभा गच्चीवर भरणार अशी सूचना चाळीच्या फलकावर लावली गेली. नाम्या ती वाचून आपल्या पारंपारिक पोषाखात वेळेच्या आधीच, ऐटीत हजर झाला होता. चाळीच्या सेक्रेटरीने तसं सूचनेमध्ये नमूद करुन त्याखाली अधोरेखित देखील केलं होतं की “सर्वांनी वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे.” त्याप्रमाणे नाम्या पंधरा मिनिटे आधीच गच्चीत जाऊन पोहोचला. अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची बसण्याची जागा एका ठराविक ठिकाणी असणार या विचाराने त्याने स्वतःसाठी बसण्याची जागा निवडली. बरं ती जागा त्याने कुठे बसल्यावर आपल्याला अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांचे चेहरे नीट दिसतील आणि त्यांचं म्हणणं स्पष्ट ऐकू येईल या दोन गोष्टी पडताळून प्रत्येक ठिकाणी बसून निवडलेली होती तसेच सभेमध्ये आपण कसं बसावं याचा त्यानं त्या दहा-पंधरा मिनिटांत सराव केलेला होता.

नेमून दिलेली वेळ निघून जाते आणि अजून कुणीच कसं आलं नाही याचा विचार करत असताना नाम्याला गच्चीच्या दुसऱ्या बाजूला चाळीतल्या लोकांची कुजबुज ऐकू येते. जेव्हा तो सभेच्या ठिकाणी येऊन पोहचतो तेव्हा त्याला अध्यक्ष आणि सेक्रेटरीभोवती चाळीतल्या रहिवाशांची गर्दी बसलेली दिसली आणि त्यामुळे बिचाऱ्या नाम्याला त्या सभेत सर्वात शेवटची जागा मिळाली. भिंतीला पाठ टेकून नाम्या खाली बसला आणि त्याच्या पुढे बसलेल्या घारु अण्णांच्या भिंगेच्या चष्म्याच्या काचांमधून त्याला अध्यक्षाचा किंवा सेक्रेटरीचा चेहरा दिसतोय का ते बारीक डोळ्याने पाहायचा प्रयत्न करु लागला पण त्याला त्या भिंगेतून सगळे उलटे बसलेले दिसले आणि म्हणून त्याने घारु अण्णांना त्यांच्याच आवाजाची नक्कल करत नाकातल्या नाकात बोलल्याप्रमाणे विचारलं, “काय अण्णा, खास सभेसाठी चष्मा उलटा घातलाय वाटतं?” हे ऐकून घारु अण्णा मागे वळून त्याचा कान पिळत म्हणाले, “कार्ट्या! सभेमध्ये तुला असले वात्रट विनोद सुचतात नाम्या. मुकाट लक्ष दे.” आणि नाम्या हाताची घडी तोंडावर बोट ठेवून, एक टक लावून सभेमध्ये ‘लक्ष’ देऊन ऐकायचा प्रयत्न करु लागला.

अध्यक्षांनी सभेला सुरुवात करून सेक्रेटरी यांना सभेच्या विषयाबद्दल बोलण्यास विनंती केली. सभेला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि आपण काही महत्त्वाचं चुकवलं नाही हे पाहून नाम्याला हायसं वाटलं आणि सभेच्या विषयावर चर्चा सुरु झालेली पाहताच नाम्याला हुरुप आला. तो सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होऊन विषयाला अनुसरून बरेच सल्ले देऊ लागला, चाळीतल्या समस्यांवर उपायसुद्धा सुचविले आणि त्यामुळे सभेशेवटी नाम्याचे सर्वजणांनी कौतुक केले. त्याच्याभोवती चाळीतल्या रहिवाशांचा घोळका जमा झाला. पाठीवर शाब्बासकीची थाप पडली आणि त्या थापेने नाम्या भानावर आला. ती शाब्बासकीची थाप नसून घारु अण्णांनी त्याला गेली २ मिनिटं भानावर येण्यासाठी मारलेल्या चापट्या होत्या. नाम्या भानावर येतोय हे पाहून घारु अण्णांनी त्याला विचारलं, “नाम्या! मुर्खा! लेका, काय रे डोळे उघडे ठेवून झोपलेलास काय! कसल्या तंद्रीत होतास? सभेमध्ये लक्ष होतं की नाही?” एवढं आपण सभेमध्ये गेलो आणि लक्षच नाही दिलं असं सर्वाना समजल्यावर आपल्याला सर्व हसतील म्हणून नाम्या त्यांना म्हणाला, “म्हणजे?, हा काय प्रश्न झाला अण्णा? लक्ष होतं तर.” पुढे होऊन घारु अण्णांच्या कानात तो सांगू लागला, “तुम्हाला माहित आहे मी कसा सक्रिय आहे. आधीच सर्व तयारी करून ठेवतो त्यामुळे मी फक्त पुढील सर्व योजना आखत बसलो होतो आणि त्यामुळे तुम्ही मला हाका मारत होता हे कळलं नाही. बस्स तेवढचं!” असं बोलून दोघेही गच्चीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरुन आपापल्या घरात गेले.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता. सभेत सांगितल्याप्रमाणे सकाळीच सर्व रहिवाशी चाळीची साफसफाई करण्यासाठी लवकर उठले होते आणि आपापलं घर, घरासमोरील जागा, सार्वजनिक जागा स्वच्छ करायला करायला त्यांनी सुरुवात केली होती. नाम्या डोळे चोळत बाहेर आला आणि सर्वांना कामाला लागलेलं बघून आश्चर्यचकित झाला. शेजारचे घारु अण्णा पण काम करत आहेत हे पाहून त्याला दुःख वाटलं, त्याने लगेच त्यांच्या हातातला झाडू घेतला आणि काळजीने विचारलं, “काय अण्णा? मी आहे ना. कशाला तुम्ही एवढी दगदग करता आणि काय हो? आज सर्वजण चाळीची झाडून साफसफाई करत आहेत. काय खास काय आहे आज? इथे मी असताना मला कुणीच बोलावलं नाही. निदान तुम्ही तरी हाक मारायची.” अण्णा, नाम्याच्या टपलीत देत म्हणाले, “गाढवा, तुला खिडकीतून हजार हाका मारल्या, तू आपल्या ढेंगा वर करून झोपला होतास. कुंभकर्ण लेकाचा! आणि आता तोंड वर करून मलाच विचारतोस? आणि काय रे काल लक्ष होतं ना सभेत की आडनावाप्रमाणेच बहिरट? योजना आखत होतो म्हणे!” अण्णा जोरजोरात आपल्याला ओरडत आहेत आणि त्यामुळे चाळीतल्या इतरांचं लक्ष आपल्याकडे जात आहे हे पाहताच नाम्या अण्णांचा हात पकडून त्यांच्या घरात घेऊन गेला आणि कसलंतरी गुपित अण्णांनी सर्व जगाला सांगितलं या आवेशात तो अण्णांना म्हणाला, “असं काय करताय अण्णा, अहो सर्वांसमोर नका बोलूत माझ्या योजनांबद्दल. चाळीचं उज्ज्वल भविष्य बघणारा मी नाम्या, सर्वांसाठी काही पण करेन. तुम्ही बघाच आता मी माझ्या योजनांची कशी अंमलबजावणी करतो.” असं बोलत नाम्याही स्वतःच्या घरात जाऊन संपूर्ण घराची आणि घराबाहेरची साफसफाई करु लागला. संपूर्ण दिवसभर चाळीतले रहिवाशी उद्या येणाऱ्या खास दिवसाची चर्चा करत होते. नाम्याला त्या गोष्टीचा पत्ताच नव्हता. त्यानं काहीतरी वरवरचं ऐकलं होतं की कुणीतरी चाळीत पाहुणे येणार आहेत.

रात्र झाली. चाळीतल्या एका कोपऱ्यात मंद प्रकाश असलेल्या दिव्याखाली नाम्या आकाशाकडे बघत बसला होता. लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे बघत तो असा विचार करत होता की हे स्वयंप्रकाशी तारे इतके आहेत पण त्या चंद्राचा प्रकाश स्वतःचा नसूनसुद्धा तो किती उजेड देत आहे. तो स्वतःला त्या चंद्राप्रमाणे समजून ताऱ्यांमध्ये चाळीतल्या इतर रहिवाशांना बघत होता. तेवढ्यात त्याला एका ताऱ्यात घारु अण्णा दिसले. ते मंद प्रकाशाने लुकलुकत होते. नाम्याला अण्णांना तसं बघून फार वाईट वाटलं, आपल्याला त्यांच्या बाजूला जायला हवं म्हणजे ते जास्त प्रमाणात लुकलुकायला लागतील म्हणून केविलवाण्या नजरेने नाम्या हा चंद्र, घारु अण्णा या ताऱ्याजवळ गेला. घारु अण्णा त्याला शाब्बासकी देत म्हणाले, “व्वा नाम्या, केवढा तो तुझा लख्ख प्रकाश. माझे डोळे दिपून गेले मेल्या! अगदी सूर्याला गिळंकृत केलंयस की काय बावळटा! बस्स झालं आता. जा आता झोपायला.” नाम्याला कळेच ना, मनातल्या मनात विचार करायला लागला, “हे असं काय म्हणत आहेत? एकतर आपण त्यांना एवढं झळाळून टाकलं आणि हे आपल्यालाच घरी जा सांगत आहेत. आणि मी चंद्र आहे मला कुठलं घर?” त्यावेळी घारु अण्णांनी परत त्याला एक टपलीत दिली तेव्हा कुठे नाम्या पुन्हा डोळे मिचकावत भानावर आला. “काही नाही उद्या मोठा दिवस आहे, सर्व तयारी झाली आहे ना नीट ते आठवत होतो”, असं बोलत नाम्या डोळे चोळत चोळत घरात गेला.

रविवार उजाडला. सकाळीच ९ वाजता अध्यक्ष आणि सेक्रेटरी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी गल्लीच्या नाक्यावर हार आणि पुष्पगुच्छ घेऊन उभे राहिले होते. नाम्या आपला घराबाहेर नेहमीप्रमाणे त्याचे पारंपरिक जुने गंजीफ्रॉक आणि रंगीत पट्टे असलेली पँट झटकून वाळत घालत उभा होता. तेवढ्यात नाक्यावर चाळीतल्यांची गर्दी झाली. नाम्या ती गर्दी कठड्याचा आधार घेऊन खाली वाकून बघू लागला. विविध देशांतून काही अधिकारी गिरगांवातील चाळ संस्कृतीचा अभ्यास करायला आले होते आणि त्यांनी काही चाळींपैकी नेमकी ‘डोंबल्याची चाळ’ निवडली होती. अध्यक्षांनी पाहुण्यांचं स्वागत केलं, चहापाण्याची सोय आधीच केलेली होती, सर्व आटपून त्यानंतर चाळीचा फेरफटका मारण्यास सर्व अधिकारी आणि त्यांच्या मागोमाग अध्यक्ष आणि सेक्रेटरी निघाले.

अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्या अधिकाऱ्यांना आपल्या चाळीचा कसलाच नसलेला इतिहास, मराठ्यांपासून पेशव्यांपर्यंत असलेला राज्यकारभार उगाच मोडक्या तोडक्या इंग्रजीत इथेच कसा चालायचा हे वर्णूंन सांगत होते. अध्यक्ष म्हणाले, “मिश्टर विल्यम्सन, मराठा की नाही, हियर लिव्हिंग, इन अव्हर चॉल.. टिल डेट.. बोल की रे सुर्व्या.” मग तिथे उभे असलेले सुर्वे बोलायला लागतात, “येस येस, ओके ओके, राईट मिस्टर प्रेसिडंट, आय एम मराठाज पूर्वज आय मीन टू से अँसेस्टर”. सेक्रेटरी मध्येच हसू दाबत बोलतात, “ही मिन्स, मराठाज हिज पूर्वज.. ओह अँसेस्टर.” अध्यक्षांना सुर्व्यांनी प्रेसिडंट बोललेलं समजत नाही त्यामुळे अध्यक्षांचाच इंग्रजी माध्यमात शिकणारा मुलगा नाकात बोट घालून म्हणतो, “डॅडा, प्रेसिडेंट मिनिंग अध्यक्ष” आता हे उलट की सुलट याचा तिथे कुणालाच थांगपत्ता लागत नाही, पण त्या अधिकाऱ्यांना जे समजायचं होतं ते समजलं. पुढे चाळीचं सार्वजनिक ठिकाण म्हणजे ‘शौचालय’ दाखवायची पाळी अध्यक्षांवर आली. त्यांनी खास पुढे येऊन त्या शौचालयाचं वैशिष्ट्यं काय आहे ते पाहुण्यांना सांगायचा प्रयत्न केला आणि उगाच आपण अध्यक्ष झालो आणि इंग्रजी बोलतोय याचा आव आणत डोक्याला हात लावत ते म्हणाले, “हात तिच्या मारी टोपी, मिश्टर काय तुमचं नाव ते.. हाss हाss हाss विसरलो बुवा…” आता अध्यक्ष काय म्हणाले हे त्या अधिकाऱ्यांना काय कळणार, पण संपूर्ण चाळ खो खो करून हसली. अध्यक्ष पुढे म्हणाले, “शांतता राखा, हां तर बरं, मिश्टर काय ते तुमचं नाव? हम्म… मिश्टर विल्यम्सन, धिस इज अव्हर की नई कॉमन पॅलेस.. हम्म.. चुकलं पॅलेस नव्हे प्लेस.. व्हेअर वी ऑल कम टुगेदर टू क्लीन अव्हर इन्साईड स्टमक वेस्ट, काय तो ‘संडास’, काय हो सेक्रेटरी बरोबर ना? सेक्रेटरी मान हलवत, “येस अव्हर एंटायर पीपल बाथरूम”. त्या अधिकाऱ्यांना यांचं बोलणं वगळता चाळीचं एकूण बांधकाम बघूनच कळलं होतं की कुठे कुठे काय काय केलं जातं.

त्यानंतर अध्यक्ष पाहुण्यांना घेऊन चाळीच्या पहिल्या मजल्यावर आले. पहिलंच घर घारु अण्णांचं, एक वयस्कर व्यक्तिमत्त्व म्हणून सेक्रेटरीने घारु अण्णांची ओळख करुन दिली, “धिस इज रिस्पेक्टेड घारु अण्णा ऑफ अव्हर ओल्ड चॉल, ही इज की नई अव्हर फादर फिगर अँड ऑल टाईम चिफ गेस्ट ऑफ ऑल कल्चर्ड प्रोग्राम्स”, आपल्याला चिफ गेस्ट म्हणून ओळख करून दिल्याबद्दल घारु अण्णांनी लगेचच शर्टची कॉलर ताठ केली आणि या प्रमुख पाहुण्यांबरोबर आपणही एक प्रमुख पाहुणे आहोत या आविर्भावात त्यांच्या पाठोपाठ चाळभर फेरी मारायला गेले.

पुढे नाम्याच्या दारात सर्व मंडळींनी घोळका केला. अध्यक्षांनी पाहुण्यांना नाम्याची ओळख करून दिली, “धिस इस अव्हर खास बरं का मिश्टर विल्यम्सन, स्पेशल मॅन ऑफ दि चॉल” हे ऐकल्यावर लगेच नाम्याने पाहुण्यांसमोर हातातली रंगीत पट्टे असलेली धुतलेली ओली पँट आणि गंजीफ्रॉक जोरात झटकला आणि डोळे मिचकावत हसत म्हणाला, “अरे तुम्हीच का ते आमचे पाहुणे? मुंबईमध्ये गिरगांवातल्या चाळींचं निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी आला आहात.. व्वा! या, या स्वागत आहे.” झटकलेल्या पँटचे आणि गंजीफ्रॉकचे शिंतोडे आलेल्या पाहुण्यांच्या, अध्यक्षांच्या, सेक्रेटरीच्या चेहऱ्यावर आणि घारु अण्णांच्या चष्म्याच्या काचेवर उडाल्यामुळे, लग्नसमारंभामध्ये ठेवण्यात येणाऱ्या नक्षीदार, सुबक आकाराच्या कारंज्यातून पाण्याचे शिंतोडे चेहऱ्यावर उडावेत तसा प्रत्यय तिथे जमलेल्या सर्वाना आला. हा सर्व प्रकार पाहता अध्यक्ष आणि सेक्रेटरीच्या चेहऱ्यावर शिंतोड्यांऐवजी पावसाळ्यामध्ये चाळीसमोर साचणारा चिखलच जणू उडाला असे वाटले. परदेशी पाहुण्यांच्या मागे आपणही प्रमुख पाहुणे आहोत या आविर्भावात उभे असलेले घारु अण्णा तर भानावर आले आणि तसेच पुढे येत रागाने ओरडत म्हणाले, “अरे बेअकल्या, मुर्खा नाम्या…” पुढे काही अण्णा बोलणार तेवढ्यात पाहुण्यांनी त्यांना अडवलं आणि बाकी रहिवाश्यांपेक्षा नाम्याचा पोषाख आणि वागणं चाळ संस्कृतीला कसं अधिक साजेसं आहे याबद्दल सांगून नाम्याचं कौतुक केलं. नाम्याची सर्वांसमोर खूप स्तुती केली. त्यांच्या मते बाकीच्यांनी उगाच दिखावा केल्यासारखे इस्त्री केलेले नवीन कपडे, इंग्रजीत बोलायचा आव हे सर्व खोटं नाटक वाटलं. पण नाम्याच्या दररोजच्या अवतारात म्हणजेच गंजीफ्रॉक आणि रंगीत पट्टे असलेली पँट आणि शुद्ध स्वतःच्या भाषेत नाम्याने त्यांचं केलेलं स्वागत हेच त्यांना आवडलं. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी नाम्याबरोबर हस्तांदोलन केलं, त्याच्याबरोबर फोटोदेखील काढले. हा सर्व प्रकार चाळीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि घारु अण्णा चाळीच्या जिन्याजवळ उभे राहून हातात पुष्पगुच्छ घेऊन बघत होते. काही वेळाने ते पाहुणे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचे आभार मानून आपल्या पुढच्या कामासाठी दुसऱ्या चाळीत निघून गेले.

संध्याकाळ झाली. चाळीतील सर्व रहिवाशांनी नाम्याच्या घरात येऊन हलकल्लोळ माजवला. घारु अण्णा आणि चाळीचे अध्यक्ष नाम्याच्या शेजारीच बसले होते. नाम्याच्या पाठीवरुन लाडाने हात काय फिरवीत होते, काय ते नाम्याचं कौतुक, जसा काय नाम्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीतून पहिल्या क्रमांकानेच पास झाला होता. घारु अण्णा नाम्याला म्हणाले “नाम्या, पठ्ठया, बरा छुपा रुस्तम निघालास रे! हीच काय ती तूझी योजना, जी तू गेल्या दोन-तीन दिवसांपासून मला सांगत नव्हतास?” नाम्या त्याच्या विचित्र पद्धतीने डोळे मिचकावत म्हणाला, “अहो कसली योजना घेऊन बसलात अण्णा, त्या सभेत माझं लक्ष पण नव्हतं मी उगाच आपल्या तंद्रीत होतो त्यामुळे मला त्या सभेत नक्की काय घडलं काहीच कळालं नाही. तुम्ही जेव्हा पाठीवर धपाटे दिलेत तेव्हा मी जागा झालो.” अण्णा नाम्याकडे आश्चर्यचकित होऊन रागाने म्हणाले, “म्हणजे? कार्ट्या! अरे गधड्या, नाम्या मग तुला माहितच नव्हतं पाहुणे येणार आहेत ते!” नाम्या म्हणाला, “माहित होतं.. पण.. मला माहित नव्ह्तं.” “आता बोलतोस का देऊ एक रट्टा पाठीत?”, अण्णांचा संताप पराकोटीला पोहोचला होता.

नाम्या सर्व हकीकत आपण कसे सर्वश्रेष्ठ आहोत या तोऱ्यात सांगू लागला, “म्हणजे, चाळीत पाहुणे येणार असल्याची कुजबुज तशी कानावर आली होती माझ्या पण मला वाटलं सेक्रेटरींच्या बहिणीसाठी कुणी पाहुणे बघायला येणार असतील म्हणून मी विषय सोडून दिला आणि त्याच्या आदल्या दिवशी नाही का मी भिंग घेऊन वर्तमानपत्र वाचत असताना तुम्ही मला पाहिलतं? तेव्हा मी या परदेशी अधिकाऱ्यांचीच बातमी वाचत होतो. बातमी अशी होती की, ‘विविध देशांतून मुंबईमधील चाळींचा अभ्यास करण्यासाठी काही परदेशी अधिकारी येणार आहेत’ आणि त्यावेळी मी त्या बातमीच्या अगदी तळाशी पोहचलो होतो अण्णा. दूरदृष्टी मला त्याच दिवशी लाभली होती. पण पाहुणे नेमके कोण आणि कशासाठी येणार हे पक्कं माहित नव्हतं” हे वाक्य पूर्ण होताच नाम्याच्या घरी जमलेली सर्व मंडळी पसार झाली आणि घारु अण्णांनी नाम्यासमोर कोपरापासून हात जोडले.

5 Comments

  1. अगदी पु. ल. Style ने लिहिलंय. पुलंनी रेखाटलेल्या एखाद्या व्यक्तीचित्राची आठवण येते हे वाचताना.
    मस्तच आहे!!

  2. कल्पेश, वर्णने छान आहेत, मजा येत होती कथा वाचताना

  3. उत्तम. मजा आली. डोळ्यांसमोर उभी राहते गोष्टीतील चाळ

  4. हो पु.ल. आणि चाळ आणि हे पात्र छान जमलंय. नामु परिट पण असा होता I guess

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version