– स्नेहा रानडे /
आज तिची नजर वारंवार त्याच्याकडे जात होती. तिने कितीही ठरवलं तरी त्याच्याकडे सारखं लक्ष जात होतं. त्याचं सावळं रूप तिला फार मोहवत होतं. नुकताच पावसात भिजल्यामुळे त्याच्यावरून ओघळणारे पावसाचे थेंब तिला त्याकडे खेचत होते. तोही तिला शीळ घालत साद घालत होता.. जवळ बोलवत होता..
तिला आठवत होता तो तिच्या सुखदु:खाचा साथीदार.. कित्येक वेळा त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन ती नुसती बसली होती.. त्याच्याबरोबर गोडाधोडाचं जेवली होती. त्याच्याबरोबर बसून जग फिरायची. अनेक गोष्टी तिने न सांगता ही त्याला कळत होत्या.. अनेक गुपिते सांगितली होती. तिची स्वप्न सांगितली होती.. स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी प्लॅनिंग (नियोजन) केलं होतं.
तोही न बोलता तिचं सगळ ऐकून घ्यायचा, तिच्या आनंदात सहभागी व्हायचा.. खुशीत असेल तर कवेत घ्यायचा.. तिला शेजारी बसवून फिरवून आणायचा.. तिच्याकडून कधी कधी हातांना तेलाने मालिश करून घ्यायचा.. आणि मग मस्तपैकी तिच्याकडून आंघोळ घालून घ्यायचा. स्वत:ला रगडून घ्यायचा.. ती ही प्रेमाने करायची.. त्याला न्हाऊ घालायची..
आजही तो तीला शीळ घालत होता.. तिला आपल्याकडे बोलावत होता.. आणि तिला सगळी कामं बाजूला ठेऊन गप्पा मारायला बोलावत होता.. तिनेही त्याचे ऐकले.. आणि गेली काफीचा mug घेऊन त्याच्याकडे पुढचा अर्धा तास फक्त तिचा आणि त्याचाच होता…
तिचाच लाडका,
झोपाळा…