– प्राची अष्टमकर / कविता /
आल्या श्रावणसरी
गं बाई श्रावणसरी…
मन पाखरू होऊनी
गेले गेले गं माहेरी
मन गेले गं माहेरी…
माझ्या माहेरच्या दारी
लाल मातीचं अंगण
चहूबाजूंनी तयाच्या
हिरव्या मेंदीचं कुंपण …
नित्यनेमाने गं होई
छान सडा संमार्जन
आई रेखिते त्यावरी
रंग रांगोळी सुंदर …
अंगणा मध्ये शोभते
तुळशीचे वृंदावन
झुंजू मुंजू झाल्यावरी
तेथे तेवे नंदा दीप
टप टप प्राजक्ताचा
सडा पडतो दाराशी
किती वेचल्या वेचल्या
मोत्या पोवळ्याच्या राशी…
कंच हिरव्या पानांत
शुभ्र तगरीचं चांदणं
लाल मातीवरी शोभे
हिरवळीचं गोंदणं…
रवी किरणं लेवूनी
चाफा झाला गं सोनेरी
उमलली जास्वंदी
लाल, केशरी आनंदी…
साज रंगांचा पाहुनी
नभी इंद्रधनू लाजते
मन श्रावणसरींनी
माझे चिंब चिंब होते
मन चिंब चिंब होते…