पावसातला माणूस

– मेघना अभ्यंकर / लघुकथा /

अनेकदा असं होतं की तुम्ही पुर्ण कथा लिहिता पण त्या कथेसाठी तुम्हाला योग्य ते नावच सापडत नाही. पण या कथेबदद्ल मात्र असं नाहीये खरंतर ही कथा लिहिली जाईल की नाही अशी परिस्थिती होती तेव्हा देखील, ‘जर मी कधी या किस्यावर कथा लिहिली तर त्याचं नाव पावसातला माणूस हेच असणार’ हे मी मनात नक्की केलं होतं. हा किस्सा घडल्यानंतर तब्बल चार वर्षांनी मी ही कथा लिहीत आहे. तेव्हा मी २१ वर्षांची कॉलेज ला जाणारी मुलगी होते आणि आता मी तब्बल २५ वर्षांची नोकरी करणारी, लग्नाचे स्वप्न पाहणारी मुलगी आहे. आणि या लग्नाच्या बंधनात अडकण्याआधी मला एकदा त्याच्यासारखं मोकळं होऊन बघायचे आहे, आणि आता खरंतर माझं लग्न सुद्धा ठरलं आहे, सो ते होण्याच्या आधी मला एकदा त्याला भेटायचे आहे, तो ज्याप्रमाणे म्हणाला होता त्याप्रमाणे मर्यादित काळासाठी का होईना पण मला स्वातंत्र्याची किंमत मोजून ते अनुभवायचे आहे. पण, नेमकं कसलं स्वातंत्र्य आणि त्याची कसली किंमत आणि तो माणूस कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर हा किस्सा तुम्ही सुरवातीपासून ऐका…

चार वर्षांपूर्वी मी जून महिन्यात कोल्हापूरला एका परिक्षेसाठी मुंबईहून गेले होते आणि तिथून परताना मुंबईला जाण्यासाठी रात्री जी बस पकडली आणि ती रात्री २ च्या सुमारास बंद पडली. आता नवीन गाडी येऊन ती सुरु होऊन, आम्ही निघायला वेळ लागणार होता, त्यामुळे नवीन गाडी याच बस स्टॅंन्ड वरती येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल असे सांगून, जुनी गाडी देखील दुरुस्त करायला, आम्हाला एका एसटी स्टँडवर सोडून ड्रायव्हर निघून गेला. पावसाचे दिवस होते आणि त्या रात्री पाऊसही जोरात पडत होता. त्यामुळे, काही खायला वगैरे घेण्याच्या ऐवजी प्रवाशांची धावपळ आडोसा शोधण्यासाठी झाली. माझ्याकडे तसं सामान कमीच होतं, त्यामुळे या धावपळीत मला जरा जोरात पळता आलं. थोडसं बसण्यासाठी आणि जरा डोळा लागला तर डोकं टेकवण्यासाठी अशा प्रकारची एखादी जागा मी शोधत होते. तेवढ्यात एका चहाच्या टपरीमधून एकाने मला बोलावलं, “इथे आहे बसायला जागा.” मी लक्ष देऊन पाहिलं तर माझ्याच वयाचा एक तरुण मला तिथे दिसला, एकटाच माणूस आहे, सोबत बाईमाणूस कोणी नाही अशावेळी आपण बसायला जावं असा विचारदेखील आला. पण, कुठेतरी निवारा गरजेचा होता, जागा बरी होती, एक चहाची टपरी होती, शेजारीच बसायला ओटा होता, गरज लागली असती तर जरा आडवं सुद्धा होता आलं असतं. असा विचार करत आत जाऊन बसले.

थोड्यावेळाने, त्याने विचारलं, “तुम्ही माझा हा शर्ट पकडता का जरा?” “अ…” काय? मी म्हणले. “हा शर्ट पकडता का, खुप मस्त पाऊस आला आहे. खुप दिवस झाले पावसात भिजलो नाही आहे” तो म्हणाला, “बरं” मी म्हणाले. माझ्या हातात शर्ट देऊन, तो इसम पावसात मनसोक्त भिजला, नंतर माझ्याकडून कपडे घेतले आणि कुठेतरी आडोशाला जाऊन दुसरे कपडे बदलून आला आणि मला विचारलं, “चहा घेणार?”, मी स्टॅंन्डवरच्या टपरीकडे बघत म्हणलं, “आताच पावसात भिजलात तुम्ही आता चहा आणायला परत जाणार?” “छे, हो आता कशाला भिजत जाऊ, हा थर्मास आहे ना, यात आहे चहा दोन कप, तुम्ही पण कुडकुडताय थंडीत म्हणून म्हणलं घेणार का?”
खरंतर मी चहा घेत नाही पण पोटाला काहीतरी गरम मिळण्याची आवश्यकता होती त्यामुळे हो म्हणलं त्याने थर्मासच्या भांड्यात चहा ओतला, चहाचा घोट घेणार तेवढ्यात वाटलं, चहा-बिहा देऊन बेशुद्ध तर नाही ना करणार, माझ्या चेहऱ्यावरचे भाव त्याला कळले असावेत त्यामुळे माझ्याकडे बघत त्याने मोठा चहाचा घोट घेतला आणि माझ्याकडे बघत म्हणाला, काही नाही मिसळलं आहे यात… “नाही नाही तसं नाही…. मी म्हणले… “जाऊ द्या हो, आजकाल इतके विश्वासघाताचे प्रकार घडतात कि तुम्ही अनोळखी माणसावर विश्वास ठेवला नाहीत याचं काही वाईट नाही वाटणार मला.”

“तुम्ही काय सगळ्या तयारीनीशीच असता का नेहमी?” मी विचारलं, “काय ते?” तो म्हणाला, “नाही, तुमच्याकडे बदलायला कपडे पण होते, चहापण होता म्हणुन विचारलं.” “नाही तसं नाही मी जादाचे कपडे आणि हा थर्मास भरुन चहा नेहमी जवळ ठेवतो खूप उपयोगाच्या गोष्टी आहेत या…. नाही का?” तो म्हणाला
“तुमची पण गाडी बंद पडली का?” त्याने विचारलं. “तुम्ही इथले नाही वाटतं” मी म्हणलं कुठे असता “आमच्या डोळ्यांवरुन कळलेच असेल की तुम्हाला.. आपल्या बारीक डोळ्यांकडे हात दाखवत”, तो म्हणाला… “का बारीक डोळ्याचे खूप लोक असतात, ईशान्य भारतातले लोक असतात, किंवा बऱ्याच आशियाई देशातील लोकांच्या डोळ्यांची अशीच ठेवण असते नाही का? “ … “हा खरं आहे, पण लोक एवढा विचार करत नाहीत, झटक्यात चिनी ठरवून मोकळे होतात, आमच्या देशात का राहता विचारतात, हिंदी येते का, मोमोज आवडतात का… चालू असतो हा त्रास.. त्यामानाने तुम्ही जागरुक आहात बऱ्याच, मी अरुणाचल प्रदेशचा आहे पण सध्या इथे राहतो “…. “बापरे खूपच लांब अंतर आहे, नोकरी करता का इकडे? “ मी म्हणलं.

नाही, ज्या प्रदेशात राहायचो तिथे कळायला लागल्यापासून वाटायला लागलं कि आपण वेगळे आहोत, या लोकांमध्ये ऑड मॅन आऊट आहोत, खूप विचार करायला स्वत:ला फिट करायचा प्रयत्न केला पण नाही झालं… शेवटी आई-वडीलांना सांगितलं, म्हणलं नाही जमत आहे, दररोज वाटतं की जिथे मला माझं काहीतरी आहे असं वाटेल ती, ही जागाच नाहीये आणि बाहेर पडलो.. “त्यांना पटलं?” मी विचारलं… माहीती नाही, पटलं असेल किंवा नसेल पण त्यांनी अडवलं नाही..
“मग सापडली का तुम्हाला तुमची जागा” मी विचारलं, “शोधतोय… वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो…सापडली असं वाटलं की राहतो….हरवली असं वाटलं कि पुन्हा शोधायला बाहेर पडतो…”
“भारी आहे तुमचं, मनाला हवं तसे निर्णय घेता येतात, ते राबवता येतात, चुकले तरी कुणाला उत्तर द्यायची गरज नाही, बरोबर आले तरी ते इतरांना दाखवावे लागत नाहीत….खूप जणांना वाटत असतं हो असं जगावं, पण नाही जगता येत.”
घरच्यांची जबाबदारी, करीअर, मग संसार, तोच टिपीकल रहाटगाडा, त्या मानाने जे तुम्हाला वाटलं ते तुम्हाला करता येतंय, निभावता येतंय.. नशीबवान आहात तुम्ही..”

आता या नंतरच्या संवादात कोण काय बोलत असेल ते तुमच्या लक्षात आलं असेलच, त्यामुळे तो म्हणला, मी म्हणले असं करुन मी कथेचा फ्लो घालवणार नाहीये. हा, मी काय सांगत होते की, माझ्या या प्रश्नावर तो म्हणाला,
बाई, प्रत्येकाला नाही वाटत असं, म्हणजे इतक्या प्रकर्षाने नाही वाटत. कारण, त्यांच्या आत कुठेतरी बाहेर पडण्यासाठी बंड करणारं मन असतं पण त्याला ते करिअर, सुरक्षा, स्थैर्य वगेरेची अमिष दाखवून बंद करु शकतात, पण जेव्हा या सगळ्याच्यावरती उठून हा आवाज तुम्हाला साद घालायला लागतो ना, तेव्हा एका क्षणात सगळे पाश तोडता येतात. घर सोडत नव्हतो तेव्हा रात्र, रात्र झोप लागायची नाही, असं वाटायचं आपली जागा दुसरी कुठेतरी आहे, आपण इथले नाहीत, तळमळत राहायचो, पण ज्या दिवशी घर सोडलं ना बाई, त्या दिवशी गार वाऱ्यात, शेताच्या आडोश्याला इतकी गाढ झोप लागली, वाटलं आपला निर्णय बरोबर आहे. घर सोडून निघाल्यानंतर लडाख मध्ये होतो काही दिवस एका हॉटेलमध्ये काम करायचो, नंतर काही दिवस बंगाल मध्ये कुली म्हणुन होतो, मग कर्नाटकात पण राहिलो. काही दिवस उडपीमध्ये भाजलेली कणसं विकायचो, आता काही दिवस इथे आहे, नंतर कुठे असेन माहीती नाही,
पण मग करिअर, भविष्य याचं आहे?

भविष्य म्हणाल तर उगवता दिवस आणि करिअर या मोठ्या पृथ्वीवरती आपल्याला आपली वाटेल अशी जागा शोधणे, असा प्रदेश शोधणे, हे साध्य करण्यासाठी करावं लागेल तेवढचं काम करतो मी….
खूप आश्चर्यकारक आहे हे सगळं, आणि आकर्षण वाटावं असं सुद्धा, इतकं स्वातंत्र्य, सगळ्याबंधनातून मुक्ततता, मला सुद्धा मिळायला हवं होतं असं स्वातंत्र्य, मला आवडलं असतं असं फिरायला, वेगवेगळी काम करायला, प्रदेश बघायला..
बाई स्वातंत्र्य इतक्या सहज नाही मिळत त्याची बरीच मोठी किंमत मोजावी लागते, मग मिळत असं मे अपने मर्जी का मालिक वालं स्वातंत्र्य..
स्वातंत्र्यांची किंमत आहे सुरक्षा, प्रेम, सहवास, एकटेपणा, कष्ट, समाजापासून वेगळेपणा, आणि आपण सतत स्वार्थीपणे वागतो आहे ही मनाला शिवलेलली भावना…
घरातून निघालो तेव्हा २० वर्षांचा होतो, रात्री- अपरात्री चालताना कित्येकदा लुबाडला गेलो आहे, अंगावरच्या कपड्यांसकट, अशावेळेस जीव वाचवणे एवढाच काय ते जमवायचे, भुकेला- तहानलेला राहिलो आहे, एखाद्या वेळेस वाटतं, असावं कुणीतरी जवळचं, पण नसायचे, तेव्हा एकटेपणामुळे वेडासुद्धा झालोय, पण या सगळ्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादी नवी जागा पाहतो, एखाद्या वाहत्या नदीच्या किनाऱ्यासोबत धावतो, जवळ जमलेल्यांना नव-नवीन गोष्टी सांगतो, आणि निर्विकारपणे सगळं सोडून दुसरा रस्ता पकडतो तेव्हा जाणवतं, जर तुम्हाला स्वांतत्र्य हवं असेल तर वाटेल ती किंमत देऊन ते आपण स्वीकारायला हवं कारण या जगात आपल्याला सुखी करणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाहीये….

पण हे स्वार्थी असल्याच्या ओझ्याचे काय, ते नाही खात राहात तुमचं मन…
बाई खरं बघायचं झालं तर प्रत्येक माणूस स्वार्थी आहे, कारण आपण परमार्थाच्या नाववार जे काही करतो त्याने आपल्याला आनंद मिळतो, समाजसेवा असेल तर नाव मिळतं, त्यामुळे इतरांसाठी जे करतो त्याचं खरं कारण आपला आनंद हेच असतं, आता यालाच काही लोक म्हणतात की, दुसऱ्यांसाठी काहीतरी करुन तुम्हाला नेहमी आनंद मिळतो तर ते काही खरं नाही. माझ्यासारख्या काही लोकांना खरंच दुसऱ्यांबदद्ल काही करुन आनंद नाही मिळत…. पण त्याच्याने माणूस म्हणून आम्ही काही कमी ठरत नाही..
बाई नेहमी लक्षात ठेवा, माणसाचा हा जन्म आपल्याला कितीतरी दशलक्ष योनींमधुन एकदाच मिळतो, तो जन्म दुसऱ्याच ऐकण्यात, दुसऱ्याला सांगण्यात, त्याच्यासाठी जगण्यात नसतो घालवायचा, तुम्हाला जे करण्यात आनंद वाटेल, ज्या प्रकारचे आयुष्य जगण्यात आनंद वाटेल ते करा, कारण या तुमच्या आयुष्यात इतर कोणीही तुमच्यापेक्षा महत्वाचे नाही आणि या आयुष्या इतकं कोणीही तुमच्या जवळचं नाही त्यामुळे याला न्याय द्या….
या नंतरही आम्ही असंच काय काय बोलत राहिलो होतो, पण माझ्या लक्षात राहिली ती ही एकच गोष्ट की, या आयुष्याला न्याय द्या, त्याच्या इतकं तुमच्या जवळंच कोणीही नाही..
साधारण पाच वाजता गाडी आली, सगळे प्रवासी, अनाऊन्समेंन्ट ऐकून गाडीच्या दिशेने धावले, मी सुद्धा माझी बॅग उचलली, आणि निघाले, गाडी लागली आहे तुम्ही नाही येणार?
कूठे?
म्हणजे तुम्ही गाडी साठी नव्हता थांबलात रात्रभर… ?
नाही माझं घर इथे जवळ आहे, ही चहाची टपरी आहे ना ती चालवतो, एका मित्राकडे गेलो होतो, घरी जायला निघालो तेव्हा पाऊस आला, मग थांबलो, तुमची गाडी बंद पडल्याचे कळलं, म्हणलं रात्री, बेरात्री एकट्या थांबणार तुम्ही त्यापेक्षा करतो तुमची सोबत.. चला आता येतो मी….
त्यावेळेस वाटलं होतं कितीतरी वेळा मी माझ्या मनात असा अतरंगी माणूस रंगवायचा प्रयत्न केला आहे, असा माणूस आपल्याला भेटेल आणि मग आपलं असं प्रेम प्रकरण वगेरे होईल, आणि आम्ही दोघेही वेगवेगळे प्रदेश फिरु, असं बरंच काय काय, हा असा हवा असलेला माणूस डोळ्यासमोर होता, वाटलं थांबवाव का याला, पण विचार पूर्ण होईपर्यंत तो गायब सुद्धा झाला होता, मी भलतीच निराश झाले, तेव्हापासुन ४ वर्ष झाली मी याला शोधते आहे. आता आठ दिवसांपूर्वी बसमधून जात असताना त्याला ओझरतं पाहिल्यासारखं झालं, म्हणुन ही कथा लिहिते आहे, ही कथा एका मासिकात प्रसिद्ध होणार आहे न जाणो ही कथा त्याच्या हातात पडली तर, त्याने ती वाचली तर, तो धावत आला तर, त्याला मी आवडले तर आणि तर आणि तर आणि तर……
पण हे सगळे माझ्या लग्नाच्या आधी व्हायला हवं म्हणून हा सगळा अट्टाहास, बाय द वे तुम्हाला भेटला कुठे तर त्याला सांगा हं ही गोष्ट!

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version