अनामिक

लेखिका – मेघना अभ्यंकर

अनोळखी शहर तेव्हा तुम्हाला आपलसं वाटायला लागतं जेव्हा त्या शहरातील माणसं तुम्हाला जवळची वाटायला लागतात. केवळ शहराच्या नावानं, तिथल्या आपल्या अस्तित्वानं शहर कधीच आपलसं होत नाही. किंबहुना, केवळ ‘शहरातील माणसं पटली नाहीत किंवा आपलं त्यांच्याशी पटलं नाही’ या सबबीवर आपली नोकरी, उज्ज्वल भविष्य वगैरे सोडून परत आपल्या मुळ ठिकाणी परत आलेल्या अनेकांच्या कहाण्या मी ऐकल्या आहेत किंवा कामानिमित्त भेट दिलेल्या अनोळखी शहरातील माणसांशी अशी काही नाळ जुळली कि परतीचा रस्ताच विसरलेली माणसंसुद्धा माझ्या ऐकण्यात आहेत.

एखाद्या शहरातील आपला निवास सुखद कि दुःखद हे आपला त्या शहरातील माणसांशी जुळणाऱ्या ऋणानुबंधांवरून ठरवता येतं. आता ही माणसं म्हणजे आपण एखाद्याच्या घरी राहत असू तर ती माणसं, किंवा त्या शहरातील आपल्याशी जोडले गेलेले आपले मित्र मैत्रीणी, ऑफिस, शाळा, कॉलेज, रोज फिरायला जातो ते पार्क, जीम मधील वर्ग, रेल्वेत ठराविक वेळापुरत्या भेटणाऱ्या व्यक्ती, कोणा एखाद्या निवडक वेळी हमखास दिसणारा फेरीवाला अशा ज्या कोणत्याही कारणांनी तुमच्या या नवीन शहरातील नवीन आयुष्याचा मर्यादित काळासाठी भाग झालेले सहचर असू शकतात!

यातल्या सगळ्याच माणसांचा तुमच्या आयुष्यावर, तुमच्या विचारांवर, तुमच्या असण्यावर परिणाम होतोच असं नाही. पण त्यातला कोणीतरी, कधीतरी तुमच्या आयुष्यावर असा काही खोल परिणाम करतो की भविष्यात पुढे-मागे तुम्ही ते शहर सोडता, तुमचं नव बस्तान बसवता तेव्हा पण या शहराने दिलेला तो माणूस किंवा त्या माणसाने या शहराची नवी ओळख तुमच्या मनःपटलावरून कधीही पुसली जात नाही. असा एखादा तुमच्या आयुष्याच्या लेणीमध्ये मनावर कोरला गेलेला तो प्रसंग, ती व्यक्ती, पुढे आयुष्यभर, एखाद्या अवचित क्षणी विजेसारखी तुमच्या मनात लखलखून जाते आणि ते शहर त्या व्यक्तीच्या रूपात किंबहुना त्या व्यक्तीमध्येच सामावलेलं शहर तुमच्या भेटीला येतं.

ही गोष्ट आहे माझ्यात कधीमधे उंचबळून येणाऱ्या, माझ्या मनातील स्वतः च्या अस्तित्वाने मला हेलकावे देणाऱ्या एका शहराची आणि खरतरं ते शहर माझ्या मनात कायमचं कोरणाऱ्या त्या व्यक्तीची!
इयत्ता दहावीमध्ये असताना पुढील शिक्षणासाठी मी घराच्या बाहेर पडले त्या त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्या शहरांमधून बाहेर पडले. कुठे एक वर्ष, कुठे दोन वर्ष तर कुठे अगदी सहा महिने सुद्धा राहिले. पण माझ्या अंगाला लागलेल्या गावातील मातीने म्हणा किंवा दुसऱ्यांमध्ये मिसळण्याच्या आधी मनात कब्जा करून बसणाऱ्या न्युनगंडामुळे म्हणा ‘मला कोणत्याही शहराने कधीही मला आपलंस करून घेतलं नाही कि कधी कोणत्या शहराशी माझी नाळ जुळली नाही. कोणत्या शहरातील शान-शौकीने मी भारावून गेले नाही की त्या शहरावर कोसळलेल्या अकस्मित संकटानं माझं मन हेलावून गेलं नाही. त्या शहरांमधील सण-उत्सव माझ्या आनंदाचे कारण बनले नाहीत की शहरातील जाज्वल्य अभिमानाच्या गोष्टी माझा अभिमान बनल्या नाहीत. अनेक थोरा-मोठ्यांच्या सहवासाने पावन झालेल्या, अनेकांच्या मनाचे कोपरे हळवे करणाऱ्या त्या शहरांमधील वास्तू माझ्यासाठी कोणत्याही आठवणी तयार करू शकल्या नाहीत. त्या वास्तूंना मी दिलेली भेट शेंदूर न फासलेल्या दगडा इतकीचं कोरडी होती. थोडक्यात काय तर, मी अनेक शहरांमध्ये राहिले पण मला त्या शहरांना जगता आलं नाही.

या शहरांच्या यादीमध्ये मागच्या वर्षी एक नाव येऊन जडलं ते म्हणजे मुंबई! स्वप्नांचं, ताऱ्यांचं, सिताऱ्यांचं, अनेक अजीबोगरीब किस्स्यांनी भरलेलं, चित्र-विचित्र कहाण्यांना साक्षी असलेलं, भुत-प्रेताची साया असलेलं, धन-संपत्तीची माया असलेलं, अनेक गौडबंगालाना जन्म देणारं, अनेक रहस्यांना स्वतःच्या पोटात लुप्त करणारं, बेभान करणारं, भानावर आणणारं, सत्यापासून दूर लोटणारं प्रसंगी कटू सत्याचा स्वीकार करायला लावणारं, महालांचं, झोपड्यांचं, राजकारण्यांचं, समाजकारण्यांचं, आम जनतेचं, बड्या नेत्यांचं, शूर पोलिसांचं, धाडसी गुन्हेगारांचं, ताजमध्ये राहणाऱ्यांचं, फुटपाथच्या पागडीला हजार रूपये मोजणाऱ्यांचं, एका रात्रीत मालामाल झालेल्यांचं, एका दिवसात कंगाल झालेल्यांचं, हिंदूंचं, मुस्लिमांचं, मराठ्यांचं, भैय्यांचं, गरीबांचं, श्रीमंतांचं हे शहर धर्म, जात, लिंग, पंथ जाणत नाही. हे शहर इथे राहणाऱ्या प्रत्येकाचं तरीही प्रत्येकाला परकेपणाची भावना सतत देणारं, हे शहर इथे राहू शकणाऱ्यांचं आणि हे शहर इथून परतलेल्या प्रत्येकाचं आपापलं, वेगवेगळं, वाटायला गेलं तर अमर्याद आणि स्वतःजवळ जपायला गेलं तर मनाचा छोटा कोपरा, डोळ्याची ओली कड, तोंडापर्यंत येऊन अडकलेला शब्द, गळ्यातून मागे सारलेला आवंढा, हाताची-पायाची थरथर आणि एकाच आठवणीत संपूर्ण शरीरात विजेसारखा धावून गेलेला अनामिक प्रवाह! ज्याच्या मोहापासून अलिप्त राहता येणार नाही ते शहर मुंबई!

या शहराची महती ऐकून मी सतर्क झाले होते. आमच्या दोघात अधिक कट्टर कोण? हे जाणून घ्यायला जणू मी मुंबईशी स्पर्धा लावू पाहत होते. पहिले काही महिने नेहमी जातात तसेच गेले. मुंबईची अनुभूती देणाऱ्या अनेक जागा मी चोखंदळल्या पण माझ्या आणि त्यांच्यातील अलिप्तपण दूर करायला त्या निष्प्रभ ठरल्या होत्या. कॉलेजवरून यायचा जायचा माझा रस्ता ठरलेला होता. त्यावर चालत असताना काय करायचं हे ही ठरलेलं असायचं. मी एका खांद्यावर बॅग घेऊन, कानात इअरफोन घालून चालायचे, ठरलेल्या ठिकाणी दूध घ्यायचं, भाजी, इतर सामान घेऊन घरी यायचं हा माझा दिनक्रम ठरलेला.
एकदा माटुंगा रोड स्टेशन वरून परत येत असताना माझ्या ठरलेल्या रस्त्यावर एक दूकान मांडलेलं दिसलं. दूकान नाही एक लहानसा हातगाडाचं होता तो! चॉकलेट, गोळ्या, बडीशेप पासून ते फणसवडी, आंबावडी, शेंगदाणे, फुटाणे, इथपर्यंत! एका बाजूला खाकरा, फरसाण, शेव असे कोरडे पदार्थ तर दुसऱ्या बाजूला पॅकबंद इडली, वडा, डोसा असे पदार्थ! हातगाड्याच्या कडेला मेथी, पालक, शेपू, फ्लॉवर सारख्या चिरून ठेवलेल्या भाज्या आणि दुसरीकडे कंगवा, आरसा, छोटी पर्स, नेलकटर, असे काही जुजबी सामान! जीवनावश्यक असणाऱ्या तमाम गोष्टींनी त्याचा गाडा भरला होता. रेल्वेस्टेशन वरून येणारा जवळपास प्रत्येक जण त्या मिनी-मॉल चा फिल देवून जाणाऱ्या गाड्याकडे बघत होता आणि काही सामान विकत घेत होता. हा गाडा चालवणारा माणूस सुटा-बुटात उभा होता. हिंदी भाषिकाशी हिंदीत, मराठी भाषिकाशी तुटक्या-फुटक्या मराठीत, काहींशी इंग्रजीमध्ये तर काही जणांशी चक्क तमीळ, गुजराती मध्ये देखील तो संवाद साधत होता. त्याचा एकंदरीत लवाजमा, बोलण्याची ढब आणि लोकांचा त्याच्याकडे असलेला ओढा बघून एक दिवस मी त्याच्या गाड्या कडे गेले आणि आपण काय घ्यावं? काहीचं न घेता नुसतं निरिक्षण करून निघून जावं का? असा विचार मी करत असताना तोच म्हणाला, “आप यहासे हररोज गुजरती है! कुछ देर रूकके बिना कुछ लिए निकल जाती है। येसा क्यों? कुछ पसंद नही आया?”

‘त्याच्या’ प्रश्नांना टाळावं म्हणून मी म्हणाले, “मसालावाले काबुली चने है?” तो निराश झाला. “नहीं, ख़त्म हो गए हैं। कल याद से लाऊंगा। आप जरूर आना कल.” मी माझ्याच हूषारीवर खूश होत घरी परतले. दुसऱ्या दिवशी मी दिसताच, गाड्यासमोर जमलेल्या भर गर्दीमधून वाट काढून त्याने “मॅडम जी” अशी मोठ्या आवाजात मला हाक मारली. त्याच्या हातात मसाला लावलेले काबुली चणे होते. मी झटकन त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पैसे देऊन निघाले. नंतरचे अनेक दिवस घरी जायला उशीर व्हायचा त्यामुळे गाडे वाल्याकडून कधी इडली तर कधी पराठा घेऊन जाणं व्हायचं. या पाच मिनिटांच्या भेटीत सामान देताना ऑफिसला लेट होतो का? कामं जास्त असतं का? असे प्रश्न तर कधी त्याने गाड्यावर विकायला आणलेल्या नवीन गोष्टीबद्दल भरभरून बोलायचा. हे सांगत असताना ‘ती’ गोष्ट विकत घेण्याचा व्यापारी आग्रह कुठेही दिसायचा नाही. बस्स! एखादा लहान मुलगा ज्या निरागसतेने आपली नवीन खेळणी दाखवतो ती निरागसता त्याच्या बोलण्यात दिसायची, डोळ्यात झळकायची!

‘तो’ कानपूरचा राहणारा होता. तिकडे लहानमोठी नोकरी करायचा. कंपनीवर आलेल्या मंदीमुळे त्याची नोकरी गेली होती म्हणून मुंबईत जम बसवण्यासाठी आला होता. सुटा-बुटाची आवड असल्यामुळे गाडा चालवताना पण तो अप-टू-डेट होऊन यायचा. हिंदी साहित्याचा, साहित्यकारांचा, त्यांच्या रचनांचा चाहता होता. एकदा कधीतरी मला पण हिंदी आवडतं असं म्हणाले होते तेव्हापासून मी आले कि कोणत्यातरी लेखकाची शायरी ऐकवायचा, साहित्यावर चर्चा करायचा! प्रेमचंदांच्या ‘दो बैल’ वर हळहळायचा. रामधारी दिनकरांच्या रश्मीरथी मधील कर्णाची कथा सांगणारी पद त्याला तोंडपाठ होती. आपल्या गावाविषयी, तिथल्या परंपरांविषयी आवर्जून बोलायचा, बोलताना त्याच्या डोळ्याच्या कडा किंचित ओलसर वाटायच्या, या मुंबई शहराच्या वाटतात तशा! एकदा माझं हिंदी ऐकून म्हणाला, “आपकी हिंदी मे एक लहर है, मानो आप बात नहीं कर रही हो, मिठी आवाज मे कोई धून गुन-गुना रही है! हमारे घर के सामने एक गिरनी थी, दिनरात घरघर चलती थी। उसमे एक लडकी काम करती थी। जब भी वह किसी से बात करती, या गिरनी से बाहर आके अपने कपडे झटकती तो लगता था उसके कपडे से झटके हुए आटे में, उसके बात करने के लहेजे में, उसके हर अंदाज में वह गिरनी की घरघर इस तरह घूलमील गयी है की गिरनी घरघर उसके पुरे बदन में एक धून पैदा करती हो। और जब भी वह लडकी मुझसे बात करती, या फिर एक हाथ से माथे पर आई लट को सवाँरती, या हाथ आगे करके पैसे लेती तो उसकी हर अंदाज़ में एक मिठी धून अपनेआप पैदा होती थी!” ही गोष्ट मी त्या दिवसानंतर कधीही नाही ऐकली. पण, त्या दिवशी ती गोष्ट ऐकताना त्याच्या बोलण्यातही अस्फुट विरहाचे सूर जाणवत होते.

या घटनेला आता अनेक दिवस झाले. त्यानंतर, अनेकदा मी त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याने एका बाईचं रस्त्यावर पडलेलं ५००० रूपये असलेलं पाकिटं त्या बाईला परत दिलं आणि नंतर त्या बाईने हाच चोर आहे असं सांगून बोभाटा केला. शेवटी पोलिसांनां ५०० रूपये देऊन त्याने स्वतः ला सोडवल्याचे किस्से सुद्धा ऐकले. जणू काही तो, त्याचा गाडा माझ्या दैनंदिन जिवनाचे भाग झाले असावेत.
मकर संक्रांतीच्या निमित्तानं तीळगुळ घेऊन ऑफिसमध्ये जावं असा विचार करून अलिकडच्या स्टेशनवर म्हणजे दादरला उतरले. मला पोहचायला उशीर झाल्यामुळे सगळी दूकानं बंद, अचानक मला त्याची आठवण झाली. २० मिनीटांचा रस्ता मी धावत १० मिनीटांत पार केला. मोठ्या आशेने तीळगूळाच्या वडीबद्दल विचारलं. ‘आणली होती संपली’ अशा आशयाच्या खूणा करून आपला गाडा लॉक करून तो निघून गेला.

त्यानंतर, दोन-तीन दिवस माझे कामात गेले. त्यामुळे, राहायला देखील मी एका ऑफिस पासून जवळच्या मैत्रीणीकडे जात होते. दोन-तीन दिवस न थकता काम करूनही काम पुर्ण न झाल्यामुळे संक्रांतीला आधी डिक्लेर केलेली सुट्टी रद्द करण्यात आली होती आणि संक्रांतीला सुद्धा आम्ही मजबूत कामं केलं होतं. आपल्या एवढ्या कामाला काडीचीही किंमत नाही. कॉलेज करा, इंटर्नशिप करा आणि वरून शिव्या खा’ या सगळ्या निराशाजनक विचारात नेहमीच्या रस्त्यावरून घराकडे निघाले होते. उशीर झाला होता तरी निराशेमुळे पाय झपझप उचलले जात नव्हते. माटूंगा रोडचा भलामोठा ब्रीज उतरल्यानंतर माझ्या पाठीमागे कोणीतरी मोठ्याने धापा टाकत आहे असं मला वाटलं. मी गर्रकन मागे वळून बघितलं तर तो धापा टाकत उभा होता, “मॅडम जी कितनी देर से आपको आवाज दे रहा था। आपका ध्यान ही नहीं है। आपने उस दिन पुछा था न के ‘तिळगुड’ है क्या? यह लिजीये किमाऊ का खास तिळगुड।” ‘संक्रात’ होती आज. माझा आवडता सण. गावी असताना मी कित्येक तास पतंग उडवण्यात घालवायचे आणि जत्रेत पाच रूपयाच्या रेवड्या विकत घ्यायचे. आज दिवसभर मी काम करत होते. पोटात अन्नाचा कणही नव्हता. आज दिवसभरात मी माझी स्वतः ची साधी दखलही घेतली नव्हती. आणि हा कोण कुठला माणूस मी चार दिवसांपूर्वी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवून अर्धा किलोमीटरचं अंतर माझ्यासाठी धावत आला होता. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं, पैसे देण्यासाठी मी बॅग पटकन चाचपली तेवढ्यात “तिळगुड घ्या आनि गोड गोड बोला” असं मोडकं तोडकं बोलून निघून गेला.

घराकडे जाताना माझ्या मनात त्याच्या विषयीची कृतज्ञता नव्हती तर या शहराने मला त्याच्या ऋणानुबंधांत अलगद अडकवल्याची जाणीव होती. दूसऱ्या दिवशी मला संक्रांतीचा किमाऊ तीळगूळ खाऊ घालणाऱ्या त्या ‘तो’ चे मला आभार मानायचे होते म्हणून मी एक गिफ्टकार्ड बनवलं आणि त्यावर ‘या शहराचा चेहरा बनून, मला या शहराच्या प्रेमात पाडणाऱ्या, अनामिका तुझे अनेक आभार! असं लिहिलं. त्याला ते कार्ड देऊन पुढे जाऊ म्हणून मी घरातून थोडी लवकर निघाले. पाहते तर काय त्याच्या नेहमीच्या जागेवर तो नव्हता. ‘आजारी वगैरे असेल, येईल उद्या’ असा विचार करत खट्टू झालेल्या मनाला नवी आशा देत मी पुढे निघाले. त्यानंतर, सलग दोन-तीन दिवस सकाळ, संध्याकाळ मी त्याच्या गाड्याची जागा बघायचे. शेवटी न राहवून त्याच्या शेजारी बसणाऱ्या केळीवाल्या आज्जी, शेंगदाणे-उकडलेली अंडी विकणारे आजोबा, पेरू-बोरं वाला सगळ्यांना मी त्याचा ठाव-ठिकाणा विचारला पण कोणालाच ठिकशी माहीती नव्हती. त्यानंतर, मी मुंबई शहर सोडेपर्यंत मी त्याला परत कधीही पाहिलं नाही. संक्रांतीच्या रात्री आपल्या एका अस्तित्वाने मला या शहराच्या ऋणात ठेवणारा, माझा तो क्षण आनंदाने, कृतज्ञतेने उजळून टाकणारा तो अनामिक, अज्ञात काळाच्या अंधारात कुठे गुडूप झाला याचा उलगडा अजून झाला नाही! आजही रस्त्यावर हातगाडा दिसला की मला मुंबई शहर माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्या अनामिकाची सावळी आठवण माझ्या संपूर्ण अंगात विजेसारखी चमकून जाते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version