सावन बरसे

– स्नेहा मनिष रानडे / पावसाचे मनोगत /

प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल… हे माझे फार आवडते गाणे. राज कपूर, नर्गिस यांचे छत्री घेऊन माझ्यासोबतच चालणं.. ओळखलंत का मला. मी पाऊस… तुमचा लाडका कधी दोडका पण.. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे.. मग ऐकायचं का????
पृथ्वीवरच्या ५ महत्वाच्या तत्वापैकी एक मी… ‘जलतत्व’… वर्षातून ४ महिने बरसणारा.. सगळ्यांना आनंद देणारा, लहान मुलांचा लाडका, शेतकरी दादांचा मित्र असा मी.. कवी माझ्यावर कविता करतात, कोणी मला सावन म्हणतात तर कोणी बारीश…
मलाही 8महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला भेटायला आवडते. मग मी येतो गर्जत, सोबतीला माझ्या प्रेयसीला सौदामिनीला घेऊन.. माझ्या पहिल्या थेंबाने मातीचा सुगंध पसरतो आणि branded सेंट अत्तरांचे भाव देखील कोसळतात.. तर असा मी… मी कधी कोसळतो, कधी रिपरिप पडतो, कधी नुसताच माज चढल्यासारखा गुरगुरतो, कधी तुम्हांला घाबरवतो, बऱ्याच वेळा शिव्या पण खातो.. बरोबर ना? मी कमी पडलो की, “काय हा पाऊस पडत पण नाही” असं ओरडता आणि जास्त पडलो की, “जळला मेला पाऊस, तो थांबायचं नावच घेत नाही!” अशा शिव्या पण खातो..
तुमच्यामधे बरेचजण असतात की माझी सुरवात झाली की बाईक वरून भिजत मस्त पैकी भटकतात. कोणी आपल्या मित्रांबरोबर कोणी आपल्या girlfriend बरोबर कोणी बिनधास्त कोणी थोडं घाबरत घाबरत enjoy करतात.. कोणी घरात बसून हातात एखादं छानसं पुस्तक, वाफाळता चहा घेत माझा अनुभव घेतात.. आनंद साजरा करतात.. हे झालं तुमचं .
पण खरं सांगू का मलाही खूप आनंद होतो मस्त बरसायला, तुमची दंगामस्ती बघायला… तुमचे आजी आजोबा तर अनुभवाचे बोल ठणकावून सांगायला माझाच उपयोग करतात, “लेका चार पावसाळे जास्त बघितलेत हो तुझ्यापेक्षा”… मग मी पण खरा आनंद वाटावा अशा बऱ्याच घटनांचा साक्षीदार आहे.. आज त्याच घटना मला तुम्हांला सांगाव्याशा वाटल्या..
मला आठवतात ते शिवाजी राजे आणि त्यांना सहीसलामत विशाळगडावर पोहचवणारे बाजीप्रभू देशपांडे.. आज तो दिवस मला तसाच्या तसा आठवतोय.. अखंड रात्रभर मी बरसत होतो आणि जीवाची बाजी लावून ते शूरवीर मावळे राजांना घेऊन विशाळगडाकडे कूच करत होते. एकीकडे मी त्यांना मदत करीत होतो कारण अखंड कोसळत असल्याने शत्रूला राजांचा पाठलाग करण्यात अडथळा येत होता आणि एकीकडे मला दु:ख ही होत होतं की मी बरसण्यापलीकडे काहीच मदत करू शकत नव्हतो.. अशी किर्र रात्र, पूर्ण दिवस बाजीप्रभुंनी अखंड घोडखिंड गाजवली आणि आपल्या मावळ्यांबरोबर पावन केली.. त्यावेळी राजांच्या डोळ्यातील पाणी आणि माझे दु:खाने बरसणे मला आजही आठवते..
दरवर्षी १५ आॅगस्ट हा माझ्या भारतीयांचा स्वातंत्र्य दिवस. तो मी आनंदाने साजरा करणार. जिथे जिथे ध्वजवंदन होणार तिथे तिथे मी पोहचणार आणि त्या क्रांतिकारकांना मानाने वंदन करणार.. त्यांच्या पुढे नतमस्तक होणं हेच माझे कर्तव्य.. कारण १५० वर्ष स्वातंत्र्यासाठी लढताना मी त्यांचा मूक साक्षीदार होतो..
जेव्हा कारगिलचे युद्ध झाले तेव्हा कमी प्रमाणात मी तिथे होतो. आपल्या आर्मी सैनिकांना लढताना बघून माझ्या अंगावर काटा येत होता आणि युद्ध जिंकल्यावर मला होणारा आनंद वेगळाच होता..
अशा बऱ्याच घटना माझ्या डोळ्यांदेखत घडल्यांत. ज्यात काही आनंदी होत्या, दु:खद होत्या.. आणि सर्वात आनंदाची गोष्ट सुद्धा माझ्यासोबतच घडली बरं का.. त्यादिवशी मी अखंड कोसळत होतो आणि त्या देवकी मातेने ८ वा अवतार म्हणजे कृष्णाला जन्म दिला आणि पुढे जाऊन त्या योगेश्वराने संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारी गीता सांगितली.. कालिदासांसाठी मी निरोप पाठवणारा दुत झालो तर पंढरीच्या विठूरायाला भेटायला जाणारा वारकरी झालो. शेतकऱ्यांचा मित्र झालो तर मैत्रीची परिभाषा पण झालो..
मला तुम्हाला भेटायला खूप आवडतं पण माझं येणं तुमच्याच हातात आहे. तेव्हा निसर्गाची काळजी घ्या, भरपुर झाडे लावा, प्रदूषण कमी करा.. मग माझं येणं नक्कीच तुम्हाला पण आनंददायी होईल..
चला बऱ्याच गप्पा झाल्या नाही का.. मी on duty आहे ..
Bye bye. काळजी घ्या घरातच रहा..

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version