‘साहित्यसम्राट’ : न. चिं. केळकर

श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक नरसिंह चिंतामण केळकर. १९३५ ते १९४७ ह्या काळात सह्याद्रि मासिकाचे ते संपादक होते. अनेक संस्थांचे अध्यक्षपद, अनेक ग्रंथांना प्रस्तावना, अनेक सभांच्या अध्यक्षपदावरून केलेली महत्त्वपूर्ण भाषणे ही केळकरांच्या कर्तृत्वाची सर्वपरिचित अंगे होत. महाराष्ट्रीय समाजाच्या जवळजवळ ४०–४५ वर्षांच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनात एक महनीय स्थान केळकरांना हळूहळू प्राप्त होत गेले. या काळाचा विचार करता, केळकर ही केवळ व्यक्ती नव्हती, तर लोकांच्या आदरास व विश्वासास पात्र झालेली संस्था होती असे म्हणावे लागते. केसरी व मराठा ह्या पत्रांचे वेळोवेळी संपादन करून त्यांनी टिळकांशी सहकार्य केलेच परंतु त्यांच्या राजकीय चळवळींनाही मनःपूर्वक सहकार्य दिले.

‘साहित्यसम्राट’ म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या जवळजवळ १५,००० च्या आसपास आहे. समग्र केळकर वाङ्‍मय ह्या ग्रंथमालेचे बारा खंड आहेत (१९३८). त्यानंतरचा खंड केळकरांची निबंधमाला (सह्याद्रि खंड) ह्या नावाने प्रसिद्ध आहे. नाटक, कादंबरी, लघुकथा, कविता, निबंध, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा ह्या सर्वच वाङ्‍मयक्षेत्रांत त्यांनी लेखन केलेले असून इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र इ. विषयांच्या क्षेत्रांतही त्यांच्या लेखणीने संचार केला आहे. दहा नाटके, आठ कादंबऱ्या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि ३०–४० विवेचनात्मक ग्रंथ ही त्यांची साहित्यसंपदा.

वाङ्‍मय म्हणजे काय, वाङ्‍मयानंदाचे स्वरूप काय, कलेचा हेतू व तिचे फल एक की भिन्न, वाङ्‍मयातून प्रकट होणारे सत्य व शास्त्रीय सत्य ह्यांतील फरक काय, अलंकार व रस ह्यांचा परस्परसंबंध काय, नवे वाङ्‍मय का व केव्हा निर्माण होते, वाङ्‍मयाच्या संदर्भात अश्लीलतेचा अर्थ काय, वास्तववाद व ध्येयवाद यांतील भेद काय, विनोद व काव्य ह्यांचे नाते काय, हास्याची कारणे कोणती, उपमेचे निर्णायक गमक काय, गद्य व पद्य आणि पद्य व काव्य ह्यांच्या परस्परसंबंधांचे स्वरूप काय, काव्याचे वर्गीकरण कसे करावे, नाटकातील पदे कशी असावीत, वाङ्‍मयीन टीका म्हणजे काय, आठवणी व आख्यायिका ह्यांत कोणता फरक असतो इ. अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांची चर्चा केळकरांनी केली आहे.

मराठी वाचकांना आणि लेखकांना वाङ्‍मयचर्चेची गोडी लावण्यात केळकरांचा वाटा फार मोठा आहे. सर्व ज्ञानशाखांबद्दल दुर्दम्य कुतूहल, तज्जन्य बहुश्रुतता, लेखनक्रीडेची हौस, युक्तिवादांची आवड, सूक्ष्म विनोदबुद्धी, जे आपल्या लक्षात आले ते इतरांना समजावून सांगण्याची इच्छा व हातोटी, लेखनात उपमितीचा सुयोग्य उपयोग करण्याचे कौशल्य आणि प्रसन्न भाषाशैली ह्यांमुळे केळकरांना उत्तम साधले ते निबंधलेखन. ते नेहमीच अत्यंत वाचनीय ठरले. ललितलेखन करण्याचा त्यांनी उत्साहाने प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यांचे लेखन विवेचनात्मक, निरूपणात्मक, युक्तिवादात्मक, स्पष्टीकरणात्मक आणि विचारक्रीडात्मक होते. ह्या लेखांत मात्र ते विलक्षण गोडवा आणि लालित्य निर्माण करू शकले. केळकरांचे साहित्यसम्राटपद ह्याच लेखनावर मुख्यतः अधिष्ठित आहे.

संदर्भ :

१. कुळकर्णी, वा. ल. न. चिं. केळकर वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९७३.

२. केळकर-वाढदिवस – मंडळ, केळकर, आवृ, दुसरी, पुणे १९३२.

३. जोशी, न. मो. संपा. कै. तात्यासाहेब केळकर विविधदर्शन, मुंबई, १९४८.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version