– मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रणरणत्या उन्हाने सारी धरणी तापली,
तनामनाची कशी काहिली की हो झाली.
कधी गच्च, गच्च होईल आकाश?
कधी सावळ्या मेघांनी झाकेल प्रकाश?
कधी आभाळाचा ताशा, तडतड वाजेल?
आणि मोत्याच्या पर्जन्य धारा बरसतील?
वाट पाहून पावसा डोळे शिणून गेले,
कधी येणार रे तू मन हे आसावले.
आला आला वारा, सोबत पर्जन्य धारा
विजेच्या चंदेरी किनारीचा साज की हो ल्याला
झाडे, वेली, पाने, फुले सुस्नात झाली,
सर्व आसमंतावर एक टवटवी आली.
तप्त धरणी अन् तप्त तनमने सारे शीतल झाले
शेतकऱ्याच्या ओठी हास्य की हो आले.
बरस असा की आनंद मिळू दे,
नकोस असा की पूर प्रलय येऊ दे.
निसर्गाचे वरदान तू, देवाचा आशीर्वाद तू,
रे मानवा ठेव याची जाणीव तू.
झाडे, डोंगर, माती यांचे कर रे जतन,
तरच निसर्ग करेल तुझे संरक्षण, तुझे संरक्षण.