भारतीय शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय गायक स्व. शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली म्हणजेच ‘पं. कुमार गंधर्व’ यांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन. कुमार गंधर्वांनी स्वतःला हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील पारंपरिक घराणेशाहीत अडकून न घेता स्वतःचीच वेगळी गायन शैली निर्माण केली ज्याने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले.
कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन, नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या–जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांच्या सर्जनतेची साक्ष देतात. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असे.
कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक, कवी विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून मा. कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बार पटेल यांना विचारले, कॅमेरात किती मोठा रोल आहे? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे? जब्बार पटेल यांनी सांगितले, पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. १९९० साली कुमार गंधर्व यांचा पद्म विभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला.
हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील पारंपरिक घराणेशाहीत अडकून न घेता स्वतःची वेगळी गायन शैली निर्माण करणारे प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व
Related articles