तालाच्या लयकारीसाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध तबला वादक पं. विभव नागेशकर

भारतीय शास्त्रीय संगीतातील ललियाना घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक पं. विभव नागेशकर. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून पं. विभव नागेशकरांनी आपल्या वडिलांकडून म्हणजेच तालतपस्वी कै. पंढरीनाथ नागेशकर यांच्याकडून तबल्याचे शास्त्रोक्त अध्ययन सुरु केले. पंडित विभव नागेशकर हे प्रामुख्याने स्वतंत्र तबला वादन तसेच तबला साथसंगतीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षांपासून संपूर्ण भारतात तसेच जगभरात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी अनेक दौरे केले.
पं. विभव नागेशकरांनी श्रीमती. झरीन दारुवाला शर्मा, पं. डी. के. दातार, श्रीमती. रोहिणी भाटे, पं. शिवकुमार शर्मा, पं. जसराज यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आणि संगीतक्षेत्रात श्रोत्यांच्या मनात नाव कमाविले. १९७७ सालापासून पं. विभव नागेशकरांचे स्वतंत्र तबला वादनाचे निरनिराळे कार्यक्रम आकाशवाणी केंद्रामधून प्रसारित करण्यात येत आहेत. पं. विभव नागेशकरांना तालमणी व तसेच वल्हेमामा तबला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उस्ताद आमीर हुसेन खान यांच्या ललियाना घराण्याची परंपरा (दिल्ली, अजराडा, लखनऊ आणि फरुखाबाद या घराण्यांचा बाज) पुढे नेण्याचे त्यांचे कार्य अखंड चालू आहे.

पंडित विभव नागेशकरांचे तबला रियाझ कसा असावा आणि कला सादरीकरण करतेवेळी कलाकाराने लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबींविषयीचे विचार.
“तबला एकल वादन करताना, तबला आणि डग्गा या वाद्याचा योग्य समन्वय आणि संतुलन साधून सादरीकरण महत्वाचे ठरते. पेशकार, कायदा, रेला, अशा रचना तिहाई बंदिशी सादर करतेवेळी त्यामधील सौंदर्यस्थळे जाणून, कोणते अक्षर आणि अक्षरसमूह महत्त्वाचा घटक आहे हे ओळखून त्यानुसार संबंधित लवेचा, चाटीचा निकास आणि विस्तार करावा. त्यामध्ये महान तबला वादकांनी त्या बंदिशीतील मूल्ये कशी जपली आहेत हे समजून घराण्यानुसार शिस्तीचे पालन करणे हे शिकविणाऱ्या गुरुला बंधनात्मक ठरते. कुठल्या शब्दावर कितपत कमी जास्त्त आघात द्यावा किंवा देऊ नये, त्या अक्षराचा निकास आपल्या गुरुकडून नीट समजावून घेणे हे महत्त्वाचे ठरते. कधीकधी एकाच परंपरेतील गुरु किंवा एकाच गुरुचे शिष्य असले तरीही योग्य रियाझाअभावी त्याने केलेले बदल त्याच्या सोयीनुसार केले असले तरी अक्षर रियाझ साधना अपुरी असल्याने गुरुने त्याला दिलेल्या तालमीचा विचार केवळ लिहून दिलेल्या वहीमध्येच राहतो. म्हणजेच सगळी परिमाणे माहीत असतात पण योग्य प्रभावी परिणाम जाणकार श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊ शकत नाही. प्रत्येक कलेला विचार, त्याची सखोल बौद्धिक दृष्टी कितपत आहे त्यावर अवलंबून असते. घराण्याच्या बंधनाबाबतीत फार कठोर असू नये, आपल्या परंपरेला ठेच लागू न देता इतर घराण्यातील चांगले जे असेल ते जरूर ग्रहण करावे. तेही आपल्या गुरुशी संवाद साधूनच. अन्यथा फारुखाबाद घराण्याची बंदिश सादर करताना त्यावर दुसऱ्या घराण्याची छाप दिसता कामा नये. आपण नेहमी प्रवाहाबरोबर राहिले पाहिजे पण त्या प्रवाहात भरकटल्यासारखे वाहत जाऊ नये. अनुकरण करावे परंतु वशीकरण झाल्यासारखे झपाटून जाऊ नये ही दक्षता घ्यावी. तबला वादकाने आपल्या स्वतंत्रवादनात गतिमानता आणि गणितीपणा याचा योग्य समतोल राखला पाहिजे. तबल्यातील अगणित गणित आणि अतिगती हि अधोगती ठरू शकते. ती हृदयापर्यंत पोहचत नाही केवळ चमत्कृती ठरते.”

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version