हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध तबला वादक कै. पंडित पंढरीनाथ नागेशकर. तबलावादनातील घरंदाज गुरु म्हणून त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि अभिजात शास्त्रीय संगीताची शान वाढविणारे आहे. तबलावादनात निष्णात करणाऱ्या पंडितजींनी जणू एका विद्यापीठाचीच पायाभरणी केली आणि वटवृक्षाप्रमाणे त्याचे होणारी वाढ आणि शाखाविस्तार याची देही याची डोळा कृतार्थ होऊन पाहिला. विद्या मिळविण्यासाठी त्यांनी अविश्रांत धडपड केली व ती शिष्यांना देताना हात कधी आखडता घेतला नाही. आपल्या एकाहून एक सर्रास गुरुजनांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि याच भावनेतून त्यांनी स्वेच्छेने सर्व शिष्यांना सर्वतोपरी पैलू पाडण्यात आपले अवघे आयुष्य वेचले.
साथसंगत करणाऱ्या तबलावादकाला मैफिलीत नेहमीच दुय्यम वागणूक मिळते याचे शल्य पं. पंढरीनाथ नागेशकरांना अनुभवाने उमजले. तशी त्यांनी संगीतसक्षेत्रातील दिग्गज कलाकारांना साथसंगत केली आहे. उ. अल्लादिया खां, फैय्याज, मंजीखां, वझेबुवा, वाजीद हुसेन, बशीर खां, अजमत हुसेन, मास्टर दीनानाथ, केशरबाई बांदोडकर, शालिनी नार्वेकर, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, राम मराठे, फिरोझ दस्तूर, भीमसेन जोशी, सुरेश हळदणकर या थोर कलाकारांना त्यांनी साथसांगत केली आहे. मात्र ते खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक म्हणूनच या क्षेत्रात अधिकतर वावरले आणि रमले.
पं. पंढरीनाथ नागेशकरांनी तबल्यांतील घराण्यांचा कर्मठपणा नेहमीच वर्ज्य मानला. वेगवेगळ्या बाजांचा आस्वाद घेताना जें सुंदर त्या सर्वाचा ध्यास घेतला. दिल्ली, फरुखाबाद, अजराडा या घराण्यांच्या शैली आपल्या शिष्यांना शिकविल्या. आज महाराष्ट्रात उत्कृष्ट साथीदार म्हणून नाव कमावलेले कितीतरी तबलावादक हे पं. पंढरीनाथ नागेशकरांचे शिष्य आहेत. त्यामध्ये, पंडित भीमसेन जोशी यांचे तबला साथीदार नाना मुळे, पं. कुमार गंधर्वांचे तबला साथीदार वसंतराव आचरेकर, त्याचप्रमाणे आज स्वतंत्र तबलावादन आणि साथसंगत याविषयी स्वतःची विशेष दृष्टी असलेले श्री सुरेश तळवलकर, व पंढरीनाथ नागेशकरांचे सुपुत्र पं. विभव नागेशकर व त्यांची नात श्रीमती. धनश्री नागेशकर वाघ असे हे पं. पंढरीनाथ नागेशकर यांचे प्रतिष्ठित शिष्यगण आहेत.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामधले सुप्रसिद्ध गोमांतकीय तबलावादक पं. पंढरीनाथ नागेशकर
Related articles