किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सवाई गंधर्व

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील गंधर्व परंपरेतील किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सवाई गंधर्व. त्यांचे मूळ नाव रामचंद्र गणेश कुंदगोळकर होते. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊंनी एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.

नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत. मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळीत बाल गायक-नट म्हणून सुरू केली होती. तिथे त्यांना काही काळ सवाई गंधर्वांकडून प्राथमिक नाट्य संगीत मार्गदर्शन लाभले. त्यावेळी सवाई गंधर्व हे नाटक दौऱ्यांमध्ये अत्यंत व्यस्त असल्यामुळे मास्तरांनी पं. भास्करबुवा बखले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे समग्र शिक्षण घेतले.

व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्च दर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते, त्यांना कसा वाव देते व मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्याधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांच्या शिष्यपरंपरेतील गायक/गायिकाच नव्हे तर संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहे. सवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी काही नावे म्हणजे भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हनगळ, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्याला त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version