गंगाधरपंतांचे पानिपत

लेखक – जयंत नारळीकर
पुस्तकाचे नाव – यक्षांची देणगी

सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

प्राध्यापक गंगाधरपंत गायतोंडे संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले इतिहासकार आहेत. त्यांची ख्याती म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत त्यांनी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या अशा ९९९ समारंभांचे अध्यक्षपद भूषविले होते आणि १००० वा अध्यक्षीय प्रसंग त्यांनी इतिहासाकरिता राखून ठेवला होता. काही दिवसांनी त्यांना ‘पानिपत’ वर आधारित परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविणार होते. ९९९ व्या समारंभाचा विषय ‘कॅटेस्ट्रॉफी थियरी’ होता आणि तिथे एका प्रसिद्ध शास्त्रज्ञ राजेंद्र देशपांडे याने या विषयावर भाषण केले होते आणि गंगाधरपंतांना या विषयाबद्दल कुठलीही अथवा कल्पना नव्हती.

सृष्टीत घडणाऱ्या घटनांची कारणमीमांसा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही मूलभूत नियम तयार केले, त्या नियमांच्या मुळाशी कल्पना एकच – ‘कुठल्याही परिणामामागे काही कारण असते आणि कारणात थोडा बदल केला की परिणामातही थोडा बदल होतो.’ क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना एखादी बाजू कोलमडते! पहिल्या एकदोन विकेट्स पडल्यातरी अजून डाव सावरेल असा आत्मविश्वास असतो. पण आणखी काही विकेट्स लवकरच पडल्या की एकदम त्याचे नर्व्हसनेसमध्ये परिवर्तन होते. अशा तऱ्हेच्या अनेक घटनांची कारणमीमांसा जुन्या गणितीपद्धतीने देता येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांना वाटे की या घटना गणिती कक्षेपलीकडल्या आहेत. पण गेल्या दशकात या घटनासुद्धा गणिती व्यवहारात बसतील असे नवे गणित निर्माण झाले ते म्हणजे ‘कॅटेस्ट्रॉफी थियरी’.

कथा सुरु होते १९७५ साली. एके दिवशी गंगाधरपंत आपले अध्यक्षीय पद भूषवून घरी परत येत असताना तिथे झालेल्या एका भाषणावर ते विचार करत होते आणि तेवढ्यात त्यांना १००० व्या अध्यक्षीय भाषणाचा विषय सापडतो पण तितक्यात त्यांच्यासोबत पुण्यातील वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर त्यांचा अपघात होतो आणि थेट ते काही तासांनी मुंबईतील आझाद मैदानावर येऊन पोहोचतात. पुण्यात झालेल्या अपघातानंतर गंगाधरपंत मुंबईतील आझाद मैदानात येऊन कसे पोहचतात यामध्येसुद्धा लेखकाने ‘कॅटेस्ट्रॉफी थियरी’च्या आधारे प्रवासवर्णन केले आहे. त्या प्रवासात त्यांनी अनुभवलेल्या अनेक स्वातंत्र्यपूर्व ऐतिहासिक घटना ज्या खऱ्या घडल्या असूनही वेगळ्याच घडत आहेत असे चित्र गंगाधरपंतांच्या डोळ्यासमोर दिसत होते.

या सर्व आश्चर्यचकित करणाऱ्या घटना पाहून जेव्हा ते मुंबईतील एशियाटिक लायब्ररीमध्ये पोहोचले आणि सर्वात पहिले स्वतः लिहिलेल्या ग्रंथमाला वाचून पहिल्या. त्यातील चार खंड बरोबर होते परंतु पाचवा खंड वेगळा होता जिथे इतिहासाला कलाटणी मिळते तो ‘पानिपतचा संग्राम’. तो बदललेला इतिहास सांगत होता की हा संग्राम मराठ्यांनी जिंकला होता. तसेच आपल्या देशाचे नाव हिंदुस्थान कसे पडले यासंदर्भात त्यांना अधिक माहिती मिळाली. त्यानंतर लायब्ररीतून ते आझाद मैदानावर एका विना अध्यक्षीय सभेमध्ये आले आणि व्यासपीठावर अध्यक्षांची खुर्ची रिकामी पाहताच स्वतः ९९९ सभा गाजवलेले गंगाधरपंत प्रेक्षकांना न जुमानता भाषण देऊ लागले. अध्यक्षीय भाषण ऐकण्याच्या तयारीत नसलेला प्रेक्षकवर्गाने गंगाधरपंतांवर आक्रमण केले आणि त्या गर्दीत गंगाधरपंत जे अदृश्य झाले ते कुणालाच दिसले नाहीत.

त्यानंतर लेखकाने गंगाधरपंत आणि राजेंद्र देशपांडे यांमधेय झालेल्या ‘कॅटेस्ट्रॉफी थियरी’ याविषयावरील चर्चा मांडली आहे त्याचं सार असं की, ‘अजून विश्वातल्या अनेक गूढ घटनांचे अर्थ शास्त्रज्ञांना लावायचे आहेत, काही बाबतीत तर विचारण्याजोगा योग्य प्रश्न कोणता हेदेखील त्यांना माहित नाही मग उत्तराची गोष्ट वेगळी.’ या झालेल्या सर्व घटनांमुळे आणि गंगाधरपंतांनी त्यांचं १००० वं अध्यक्षीय भाषण आझाद मैदानात झालं हे मान्य केलं.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version