– मेघना अभ्यंकर / ललितलेख
असं हे कदाचित आपल्या सगळ्यांबरोबरच होत असेल, म्हणजे काही जागा तुम्हाला अगदी तुमच्या वाटतात, जवळच्या, खास ठेवणीतल्या, म्हणजे दिसताना त्या जागा अगदी काही भारी असतील, बसायला, वावरायला आरामदायी असतील अशातला भाग नाही, पण तुमच्यासाठी मात्र त्या अगदी परफेक्ट असतात जसं दिवाळीच्या दिव्यासाठी वाड्यातली देवळी, किंवा घराच्या मांजरीसाठी घरातल्यांची मांडी, तोतोचान आणि तिच्या मित्रासाठी तासन्-तास गप्पा मारण्यासाठी घराच्या समोरच्या झाडावरची ती आडवी फांदी, जी त्या दोघांसाठी आपल्या पानपसाऱ्यातून त्यांच्यासाठी जागा करुन देई, अगदी तशी!
अशा काही माझ्यासुद्धा जागा आहेत, म्हणजे लिंबातल्या कृष्णा नदीवरच्या रामेश्वराच्या दगडी देवळाच्या शेजारची जागा जिथे आम्ही सगळे पाय सोडून जोरजोरात मराठी कविता आणि गाणी म्हणत बसतो किंवा मणिपालमधला मुट्टुचा किनारा ज्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची एकसारखी झाडं आहेत ते ठिकाण किंवा नागालँडमधल्या राहत्या घराची खिडकी जिथून संध्याकाळच्या सुमारास नेहमी गिटारवर वाजवल्या जाणाऱ्या संगीताचे मंद सूर ऐकू यायचे आणि डोळ्यासमोर असायचा नजर फिरवू तितका हिरगावार प्रदेश आणि त्याला मध्ये मध्ये शेंडिंग केल्यासारख्या झऱ्यांच्या रांगा.. ते दृष्य…
अशीच जिला मी माझी म्हणू शकेन अशी एक जागा मला या लॉकडाऊनच्या काळात सापडली. आमच्या घरातील मधल्या गच्चीचा पातळ कठडा, आजवर तो गाद्या, सतरंज्या वगैरे वाळत घालायला वापराल गेला आहे पण आता काही दिवसांपूर्वी त्याच्यावर बसले असताना, कठड्यावर पाठ टेकून झोपण्याची कल्पना आली…. आणि थोडी हिंमत करुन झोपले आणि डोळ्यासमोर दिसलं नजरेत मावणार इतकं आकाश, प्रवास करणारे मोठाले ढग, मध्येच हवेत विरुन जाणारे काही…. आकाशी आकाशावर काळ्या ठिपक्यांप्रमाणे दिसणारे पक्षी….. आणि जाणवलं की जागा आपली… जसं एखाद्या चित्रपटात हिरोईनला प्रथम दर्शनी पाहिल्यानंतर हिरोला जाणवतं ना की हीच ती आणि मग… असा वारा वाहायला लागतो… मनात घंटा वाजायला लागतात आणि त्या रिलेटेड जे जे काही होत असेल ते ते सगळं…. त्या क्षणात जाणवलं मला…
तशी मला आकाशाची ओढ आहेच पण त्याहुनही मला जास्त आवडतं ते आभाळ…. जे मुक्त, मोकळं, स्वच्छंदी आणि प्रकाशी आहे ते आकाश… आणि जे भरुन येतं… ओथंबतं… बरसण्यासाठी आतूर असतं… ते आभाळ… काळं-सावळं… मोठाल्या परंतु जड ढगांचं… आभाळ भरुन आलं की वाटतं, त्यातला प्रत्येक ढग पोस्टमनसारखा काहीतरी पोहचवण्यासाठी प्रवास करतो आहे… त्याच्या प्रवासात लगबग आहे पण तेवढीच जवळ असलेली ठेव पोहचवण्याची जबाबदारी सुद्धा आहे… किंवा एखाद्या गर्भार बाई सारखे दिसतात ते काळे-सावळे ढग…. यातनांसोबतच पुर्णत्वाचं तेज चेहऱ्यावर ल्यायलेले… किंवा एखाद्या चिडून-फुगून बसलेल्या मुलासारखे.. ज्याच्या डोळ्यापर्यंत पाणी येत असंत पण रागाने तो ते सतत अडवून धरत असतो ना तसे… आणि मग जशी त्या मुलाची आई आधीचा राग विसरुन, मार दिला असेल तर तो विसरुन त्या मुलाच्या पाठीवरुन एक हलका हात फिरवते आणि रागाची सगळी कवचं गळून तो मघासचा चिडलेला मुलगा हमसून—समुन रडत आईला बिलगतो… तसा हा वारा या गाल फुगवून बसलेल्या ढगांच्या खांद्यावर नाजुकपणे हात फिरवतो आणि हे रुसलेले ढग बरसायला लागतात… रिते होतात… मोकळे होतात…. आणि पळत जातात अगदी त्या लहान मुलासारखे.. जो आईच्या पदराने डोळे पुसतो आणि तिच्या हातातला खाऊ घेऊन मागचं सारं विसरुन, मोकळा होऊन परत खेळायला बाहेर पळतो… काय माहिती पण प्रत्येक वेळेस आभाळ बघितलं कि मला त्यांच्याविषयी वेगळीच कल्पना सुचते… ती कल्पना आधी दिलेल्या उपमेपेक्षा खूप वेगळी असते पण तरीही ती त्या आभाळाला चपखल बसते…. जणू काही याच्यासाठी दुसरी कोणती उपमा असूच शकत नाही… आणि हेच किती भारी आहे ना… आपल्या सगळ्या कल्पनांमध्ये आभाळ चपखल बसतं….. कितीही मोठं आवाढव्य असलं तरी आपल्या लेखणीत, छोट्या पत्रात, एखाद्या ललित लेखात दिलेल्या जागेत मावतं आणि त्याचं असणं कितीही लहान असलं तरी एकदा त्याचा उल्लेख आला कि मात्र त्या संपुर्ण लेखाला, त्या पत्राला, चुकारीच्या कवितेला, आडवळणाच्या चारोळीला.. आभाळाचाच रंग येतो… आभाळ भरताना मातीचा खावासा वाटणारा वास येतो… आणि मग ती छोटी कविता, ती चारोळी, ते पत्र, तो लेख, आणि ज्याला हे सगळं स्फुरतंय ते मन सगळंच एक आभाळ बनुन जातं… ओथंबणारं… आसुसणारं… बरसणारं… रुसणारं… फुगणारं… अस्वस्थ करणारं… चिंब भिजवणारं… आपली पोच पोहचवली की पुन्हा नाविन्य लेणारं…
एखादी गृहिणी जेव्हा डोक्यावरुन आंघोळ करुन आल्यानंतर गच्चीत उभं राहून हातातल्या मऊसुत फडक्याने आपले केस झटकत असताना जशी दिसते तसं वाटतं मला नेहमी पावसानंतरच आभाळ… बघत राहवं असं… आपण स्पर्श केला तर त्याच्या नाविन्याला.. तद्रुपतेला.. एका चैतन्याने भरलेल्या समाधीला धक्का लागेल की काय असं…. आणि ती आभाळासारखी माणसं त्यांना का असं म्हणत असतील… मोठी आहेत म्हणून… त्यांच्या कामाचा खूप विस्तार आहे म्हणुन… अहं… त्यांच्याकडे धरुन ठेवण्याची… साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे म्हणून, एखाद्याचा अपराध, एखाद्याची चूक, जे काही पोटात घालण्याची, माफ करण्याची गरज आहे ते सगळं… ते आभाळासारखंच आपल्यामध्ये धारण करु शकतात म्हणून… कदाचित त्यामुळेच आपला बाबा आपल्याला आभाळासारखा वाटत असावा… धारण करणारा… बरसणारा… कोरडा होणारा… सावली धरणारा.. आणि आभाळासारखी मनं ती ही अशीच आभाळ जसा सारा आसमंत काबिज करत तशीच.. समोरच्याला संपूर्ण काबीज करणारी.. अघळपघळ…. मोकळी…. ज्यांच्या सहवासात आपण ही एक लहान आभाळ व्हावं अशी… बरसायला शिकावं… पाझरुन घ्यायला शिकावं… पाझरायला शिकावं अशी… मोठ्या आभाळाचा हात धरुन मोठं व्हायला शिकावं… त्याच्याप्रमाणे जुन्या गोष्टी मागे सारत नवीन सुरवात करायला शिकावं… आभाळाचा हात धरुन आपण आभाळ व्हायला शिकावं..