आपल्या प्रतिभेचा निरंतर ठसा मराठी वाङ्मयावर उठविणारे श्रीपाद महादेव माटे

मराठी भाषेतील लेखक कै. श्रीपाद महादेव माटे. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जात. साताऱ्यातील आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्यापन केल्यावर माटे यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. ‘रोहिणी’ या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले.
‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांनीच लिहिलेली २०० पानी प्रस्तावना खूप गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला.

प्रासादिक, प्रसन्न, शैलीदार माटे हे विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात कसदार व विपुल लेखन करणाऱ्यांपैकी एक होते. शिक्षक, कृतिशील सुधारक, नितळ-निर्व्याज ‘माणूस’ ही गुणविशेषणे त्यांना सार्थपणे लावली गेली. त्यांच्या आयुष्यातील लेखनपर्व तसे उशिरा सुरू झाले, पण एकदा सुरू झाल्यावर वीस वर्षे ते लिहीत राहिले. दहा हजारांहून जास्त भरतील इतकी छापील पृष्ठे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. लेखनकाळ १९३० ते १९५५. संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्त्वचिंतनात्मक, इतिहासमंथन, चालू घडामोडी, निबंध, ललितलेख… असा प्रचंड मोठा पट या लिखाणाचा आहे.

‘रोहिणी’ या मासिकाचे पहिले संपादक असणा-या माटे यांनी ‘विज्ञानबोध’ संपादला. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन नंतर त्यांनी ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ मौलिक ग्रंथ लिहिला. भाषेचा जन्म आणि विकास कसा झाला, हे त्यांनी ‘रसवंतीची जन्मकथा’ या ग्रंथातून दाखवून दिले. ‘संत-पंत-तंत’ या ग्रंथात त्यांनी संतकवी, पंडित आणि शाहिरी वाङ्मयाचा परामर्श घेतला.

श्रीपाद महादेव माटे यांचा पिंड चिंतनशील समाजशास्त्राचा होता, याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून दिसून येतो. उपेक्षित जातीजमातींतील व्यक्तींच्या सुखदु:खाचे, जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी ‘उपेक्षितांचे अंतरंग’मधून केले. ‘बन्सीधर, तू कुठे जाशील?’, कृष्णकाठचा रामवंशी’, ‘तारळखो-यातील पि-या’, ‘सावित्री मुक्याने मेली’ या त्यांच्या अविस्मरणीय कथा. ‘चित्रपट ऊर्फ मला दिसलेले जग’ हे त्यांचे आत्मचरित्र सत्यनिष्ठ आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version