अजरामर कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश केशव पाडगांवकर

मराठी भाषेतील सर्व रसिकजनांचे आवडते कवी कै. मंगेश पाडगांवकर. ‘धारानृत्य’हा पाडगांवकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगांवकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ कवीवर्य बा. भ. बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी भावकाव्य शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखन सुरु केले. ‘जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३), ‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगांवकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

पाडगांवकर यांनी ‘गझल’, ‘विदुषक’, ‘सलाम’ या काव्यसंग्रहातून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविता केली. सत्तेच्या संपर्कात राहणाऱ्या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील माणसांचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांमध्ये आलेली लाचारी, दांभिकता याबद्दल पाडगावकर यांच्या मनात संताप होता तो या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला. १९६० नंतरच्या वास्तवावर भेदकपणे प्रकाश टाकणारी पाडगावकर यांची कविता नवसमृद्ध वर्गाची, त्याच्या संवेदनाहिन मनाची चिरफाड करुन वाचकांना अंतर्मुख करते.

‘बोलगाणी’ हा पाडगांवकर यांनी काव्यरचनेवर केलेला एक वेगळा प्रयोग आहे. मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले होते. पाडगावकर यांनी ‘भोलानाथ, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. १९६४ मध्ये प्रकाशित झालेला ‘वात्रटिका’हा त्यांचा कवितासंग्रह पाडगांवकर यांची एक वेगळी ओळख करुन देणारा ठरला आहे.

१९५३ मध्ये पाडगावकर यांचा ‘निंबोणीच्या झाडामागे’हा ललितलेख निबंधसंग्रह प्रकाशित झाला होता. ‘बोरकरांची कविता’, ‘विंदा करंदीकर यांची निवडक कविता’ हे त्यांनी संपादित केलेले काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’ या काव्यसंग्रहातील कवितांमधू्न दिसणारा निसर्ग व प्रेम त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या सारख्या भावगीतांमधून अधिक तरलपणे व्यक्त झाला होता.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version