मराठी भाषेतील लोकप्रिय लेखक नारायण सीताराम फडके

मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक, साहित्यसमीक्षक, प्रसिद्ध लघुकथालेखक, कादंबरीकार आणि नाटककार कै. नारायण सीताराम फडके. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र होते. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. ना.सी. फडक्यांच्या कथा भावोत्कट नाहीत, तर त्या केवळ मनोरंजन करतात, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.

अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे.
ना.सी. फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. मात्र कादंबरीलेखन हे त्यांचे विशेष कर्तृत्वाचे क्षेत्र ठरले. ‘कला ही कलेसाठीच असते, वाचकांना सौंदर्यदर्शन घडविणे व आल्हाद देणे हेच कादंबरीकाराचे प्रमुख कार्य’, ह्या भूमिकेतून त्यांनी प्रमाणबद्ध, आटोपशीर आणि लाघवयुक्त कादंबऱ्यांचे एक युगच मराठीत सुरू केले. कुलाब्याची दांडी (१९२५), जादूगार (१९२८), दौलत (१९२९), अटकेपार (१९३१), निरंजन (१९३२) ह्या त्यांच्या आरंभीच्या कादंबऱ्यांतील प्रणयरम्यता, कुशल, सफाईदार व्यक्तिरेखन, चतुर संवाद आणि मोहक भाषाशैली ह्या गुणांनी वाचकांच्या मनांची पकड घेतली. त्यानंतरच्या उद्धार (१९३५), प्रवासी (१९३७), अखेरचं बंड (१९४४) ह्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांतून प्रणयरम्यतेला त्यांनी गंभीर विषयांची जोड दिली आणि महाराष्ट्रातील काही असामान्य व्यक्तिमत्त्वांचे दर्शन त्यांतून घडविले. तथापि हे करीत असताना कल्पितालाही त्यांनी वाव दिला आणि ह्या कादंबऱ्या ‘चरित्रात्मक’ होऊ दिल्या नाहीत.

लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्‍नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ‘अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत. सखोल, अनाकलनीय, गूढ व झपाटून टाकणारे जीवनानुभव फडके ह्यांच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येत नाहीत तथापि कांदबरीलेखनाबाबत त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेशी आणि लेखनतंत्राशी ते नेहमीच सुसंगत राहिले. त्यांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. कलंक शोभा (१९३३) ह्या त्यांच्या कादंबरीवरून मराठी चित्रपटही काढण्यात आला होता. फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version