सुप्रसिद्ध मराठी लोकशाहीर श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर

सुप्रसिद्ध मराठी लोकशाहीर कै. श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर. लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद होता. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्याला कविता करण्याचा छंद लागला व त्याचा गळाही गाता राहिला. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकूनऐकून त्यांनी त्यांतही बदल केले. त्यांनाही श्रीधरची गाणी अशी लोकप्रियता मिळाली. श्रीधरच्या शिक्षकांनी शिफारस करून त्याचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे त्याच्या १६व्या वर्षी राणीसाहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे तो संस्कृत भाषा शिकला. त्याबरोबरच त्याने कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली.

बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झालेला होता परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. त्यांच्या फडात पवळा नावाची, महार जातीची एक सुंदर स्त्री होती. तिच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद, त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरून तमाशाला जाऊ लागले. तमासगिरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली.

श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !!’ ह्या जिद्दीने कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागले. बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा होता होता पठ्ठेबापूराव म्हणून ते प्रसिद्धीला आले. दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी मात बडी असा स्वतःच्या काव्य लेखनाचा निर्देश करणारा हा शाहीर पठ्ठे बापूराव.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version