आधुनिक मराठी कवितेचे जनक ‘केशवसुत’

आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक, ज्येष्ठ कवी कै. कृष्णाजी केशव दामले ‘केशवसुत’. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात प्रारंभीच्या संस्कृत काव्याचा आदर्श अल्पकालीन ठरला व पूर्वकालीन मराठी काव्य प्रभावशून्य ठरले परंतु इंग्रजीतील स्वच्छंदतावादी मनोवृत्तीच्या वर्ड्‌स्वर्थ, शेली आणि कीट्स यांसारख्या कवींचे काव्य मात्र त्यांना प्रेरक व अनुकरणीय वाटले. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.

इंग्रजी अभ्यासक्रमातून व वि. मो. महाजनींनी विविधज्ञानविस्तारातून प्रकाशित केलेल्या भाषांतरांवरून इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्य त्यांस काहीसे परिचित झाले होते. त्या काव्याच्या चिंतन मननातून केशवसुतांनी आत्मलेखनात्मक स्फुट भावकविता लिहिली व मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्माविष्काराचे नवे व क्रांतिकारक वळण दिले. त्यांच्या काव्यात व्यक्तिगत स्नेहसंबंध, कवी व कवित्व, स्त्रीपुरुषांतील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ (साक्षात्कारी) अनुभूती अशा विविध विषयांवरील भावानुभवांचा आविष्कार आढळतो. एका दृष्टीने स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचाच विविध रूपांनी झालेला हा आविष्कार आहे. ह्या मनोवृत्तीचा आविष्कार मराठी काव्यक्षेत्रात निश्चितच क्रांतिकारक ठरला; म्हणूनच केशवसुतांच्या, संख्येने अल्प असलेल्या प्रत्येक प्रकारच्या काव्यरचनेला नंतरच्या काळात स्वतंत्र परंपरा लाभू शकली.

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती.

नवीन काव्याबरोबरच काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कवींवर पडते. केशवसुतांनी अशा जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी, ‘स्फूर्ति’ (१८९६), ‘कवितेचे प्रयोजन’ (१८९९), ‘आम्ही कोण?’ (१९०१) आणि ‘प्रतिभा’ (१९०४) या महत्त्वाच्या आहेत. व्यापक मानवी जीवनाच्या संदर्भात कवी व कवित्व यांच्या कार्याची आदर्शवादी भूमिका केशवसुतांनी मांडलेली असल्यामुळे त्या भूमिकेत चिरंतन प्रेरकता जाणवते. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्ड्‌स्वर्थ व एमर्सन यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो.

सृष्टीतील सौंदर्य काव्याला प्रेरक ठरते व त्यात मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुतांनी निसर्गाकडे पाहिले. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपाखरू’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता होत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्त्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत.

केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे; असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते; अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहज हाताळले.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version