एक अंधारलेला दिवस…

– स्नेहा रानडे / सत्यकथा /

आज सकाळी तारीख बघताच लक्षात आले की २६ जुलै म्हणजे चिपळूणला पाणी आले तो दिवस. १५ वर्षे झाली त्या घटनेला आज. तरीही प्रत्येकाच्या मनात अजूनही तो दिवस भीतीदायक असाच कोरला गेला असावा. प्रत्येक चिपळूणवासीयांकडे त्याची वेगळी आठवण असेल. माझ्याकडील काही आठवणी…

२३ जुलैपासूनच जोरदार, दमदार पावसाची batting चालू होती. यावेळचा पाऊस जरासा जास्तच आहे असे म्हणत होतो आणि २६ जुलैला पहाटे ३ वाजता म्युन्सिपाल्टीचे भोंगे वाजायला चालू झाले. एवढ्या लवकर पहाट कशी हा पहिला विचार प्रत्येकाच्या डोक्यात आला आणि नंतर पाण्याचे तर भोंगे असावेत ह्यापाठोपाठच्या विचारावर शिक्कामोर्तब झाले. त्यावेळी बघितल्यावर लक्षात आले की पाण्याने आपले स्वागत डायरेक्ट घराच्या खालच्या चौकनातच केले. मग उडाली ती धावपळ मशीनची मोटर काढण्याची. बाबा आणि दादा हेच काम करत होते. घराच्या बोळातून पाणी पुढे येऊन अंगणात आले आणि प्रेसमध्ये वरच्या चौकनात आले होते त्यावेळी बाबा म्हणत होते हे त्याच्या आठवणीतील सर्वात जास्त पाणी आहे. त्यावेळी सकाळचे ९ तरी वाजले असतील. हळूहळू पाणी स्थिरावले आणि बाराच्या सुमारास उतरायला लागले आणि ३ पर्यत सगळे पाणी उतरले पण पाऊस मात्र काही कमी होत नव्हता. सगळे थोडे relax झाले होते पाण्यावरच चर्चा चालू होत्या. आईने चहा केला सगळे गप्पा मारत होते आणि परत म्युन्सिपाल्टीचे भोंग्याचे आवाज…

सगळ्यांच्या छातीत धस्स झाले आता परत पाणी भरणार अरे बापरे…. हळूहळू पाण्याने रंग दाखवायला चालू केले पण आताचे पाणी गोल उलटे फिरत फिरत भरायला लागले आणि आमच्या जाणकार बाबांनी हे पाणी काहीतरी वेगळे आहे उलटे फिरतेय म्हणजे जोरदार भरपूर येणार आणि पटापट भरणार….
आता चालू झाली खरी परीक्षा. भोंगे होतच होते पाणी वाढतच होते. संध्याकाळी ५ वाजता पूर्ण प्रेस गुडघाभर पाण्याने भरून गेला होता. अजून दोन मशिनच्या मोटार काढायच्या होत्या. किशोर दादा, उमेश दादा, बाबा त्या मोटारी काढायच्या मागे लागले होते त्यांचे हात सराईतासारखे भरभर चालले होते. त्यावेळी २-३ अहवाल छापायचे काम होते त्यामुळे भरपुर पेपर कागद आणले होते. रॅकवर ठेवलेल्या पेपरकडे लक्ष गेले ते भिजायला नकोत ही नवीन धडपड चालू झाली.

आतापर्यंत ६ वाजत होते आणि पाणी प्रेसमधून घरात जाणाऱ्या पायरीवर चढले होते. घराच्या मागून अंगणात आले होते. पाऊस थांबत नव्हता. आई, वहिनी यांची घरातील सामान उचलण्याची धावपळ आणि एकासाईडला प्रेसमधील पेपर उचलण्याची घाई. जो-तो आपणाला सुचेल तसे काम करत होता. पेपर उचलत होता. आता आमच्या कंबरेच्यावर पाणी आले होते अजूनही पेपर उचलून माडीवर न्यायची धावपळ चालूच होती पेपर माडीवर न्यायचे असल्याने लाकडी जिना पूर्णपणे भिजला होता. पाय सरकण्याची भीती वाढली होती तरीसुद्धा दादा बाबा व्रुंदा वहिनी, आई आणि मी रिमे ऊचलतच होतो. एवढे समोर पाणी होते पण आमच्या तोंडचे पाणी पळाले होते .
आता तर मागून स्वंयपाकघरात आणि पुढून मधल्याखोलीत पाण्यांचा संगम झाला .घरातील देव पाण्यात जाऊ नये म्हणून धावपळ. कपाटातील सामान हलवण्याची धावपळ, धान्याचे नुकसान होऊ नये म्हणून धावपळ चालूच होती हे सर्व करताना लाईट नव्हतेच त्यामुळे तोंडात बॅटरी धरूनच काम चालू होते. किशोर दादाने तर बाळगोपाळाला सुद्धा पाण्याचा स्पर्श केला. एक वेडी आशा पाणी कमी करण्यासाठी… एव्हाना आमच्या कंबरेच्यावर पाणी आले होते.

त्यावेळी घरी नवीन प्लेटमेकींगचे मशीन आणले होते. ते भिजले असते तर सर्वच नुकसान झाले असते… आणि घेतला गेला एक धाडसी निर्णय… मशीन उचलायचा… मशीन उचलून त्याखाली टेबले लावायची आणि ते बांधून टाकायचे. त्याबरोबर उमेश दादा, किशोर दादा, बाबा या तिघांनी तीन बाजूंनी आणि मी व वहिनीने चौथ्या बाजूने उचलण्याचा प्रयत्न केला आणि एकीचे बळ मिळते फळ या म्हणीप्रमाणे ते मशीन उचलले गेले आणि आईने पटापट टेबले खाली ठेवायचा प्रयत्न केला.आणि त्यावर मशीन ठेवले गेले आणि सुतळीने बांधून टाकले. सगळ्यांनी हुश्श केले .तोपर्यत घरातील फ्रिज सिलेंडर तरंगायला लागले होते त्यांना सुतळी बांधून टाकले. सगळीकडे किर्र काळोख, पावसाची अखंड चाललेली batting आणि हे पाणी भरायचे कधी थांबणार हा विचार, पण हाताचे काम थांबले नव्हते अजूनही कागदांची रिमे उचलून झाली नव्हती. आईच्या माझ्या छातीपर्यत पाणी पोहचले होते तरीही काम चालूच होते.

फोन वाजत होता पण उचलायला वेळ नव्हता. कोणाला काय करावे सुचत नव्हते. रात्री ११ वाजता आता आपण थांबूया जे नुकसान व्हायचे ते होऊन दे असे सांगितले त्यावेळी अतिशय सगळे दमले होते. रात्री १२ वाजेपर्यत किशोर दादा, उमेश दादा कागद वाचवता येईल तेवढा वाचवत होते. प्रयत्न करत होते. आम्ही तर निसर्गाचे आंकाडतांडव पाहत होतो आणि हतबल झालो होतो.. घरात त्यावेळी ११ फुट पाणी होते.. २ वाजता एक इंच पाणी कमी झाल्यावर आम्ही झोपेची आराधना करू लागलो.. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता सगळे पाणी ओसरले आणि राहिला होता फक्त चिखल, माती, पाण्याचा धसका आणि आठवणी…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version