भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक कै. पांडुरंग सदाशिव साने. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो.
त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेत. कुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी अशी त्यांची मनीषा होती.